यंदा ज्वारी भाव खाणार !

क्षेत्र 4 लाख 77 हजार अन् प्रत्यक्षात पेरणी 44 हजार 492 हेक्टर
यंदा ज्वारी भाव खाणार !
पिक कर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)

परतीच्या पावसाने दणका दिल्याने यंदा ज्वारी पिकाचे क्षेत्रात 91 टक्के घट आली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 4 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र असतांना प्रत्यक्षात जिल्ह्यात यंदा 44 हजार 492 हेक्टरव पेरणी झाली असून त्याची सरासरी अवघी 9 टक्के आहे. यामुळे यंदा ज्वारी चांगलीच भाव खाणार असून सामान्य माणसाच्या ताटातून ज्वारीची भाकर हद्दपार होणार आहे.

यंदा चांगल्या पावसामुळे कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी 7 लाख 26 हजार 292 हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढवले होते. यात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचे होते. राज्यात नगर जिल्ह्यातील ज्वारी प्रसिध्द असून विशेष करून जामखेड तालुक्यातील खर्ड्यातील ज्वारीला राज्यभरात मागणी असते. मात्र, यंदा विशेष करून जिल्ह्यात दक्षिण भागात परतीच्या पावसाने दणका दिला. यामुळे अनेक ठिकाणी शेतात अजूनही साठलेल्या पाण्याचा वापसा झालेला नाही.

जिल्ह्यात साधारणपणे गोकूळ अष्टमीपासून ज्वारीच्या पेरण्या सुरू होता. ज्वारी पेरणीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत कालावधी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. हा कालावधी आता संपला असून आतापर्यंत अवघी 44 हजार 492 हेक्टरवर ज्वारीची सरासरी 9 टक्के पेरणी झालेली आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटल्याने त्याचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होणार असून यामुळे ज्वारीचे दर यंदा गगणाला भिडणार आहे. झालेल्या ज्वारीच्या पेरणीत सर्वाधिक क्षेत्र हे पारनेर तालुक्यातील 22 हजार 389 हेक्टर असून त्याखालोखाल 16 हजार 308 हेक्टर नगर, श्रीगोंदा 3 हजार 459 हेक्टर आणि पाथर्डी 2 हजार 282 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे. उर्वरित तालुक्यात ज्वारीची गुंठाभर क्षेत्रावर पेरणी झालेली नाही.

गहू, हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार

जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याने आता गहू आणि हरभरा पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. या दोनही पिकांच्या पेरणीसाठी अद्याप कालावधी असून थंडी वाढल्यानंतर गहू आणि हरभरा पिकाची पेरणी होणार आहे. कृषी विभागाने गव्हाचे 56 हजार 863 हेक्टर तर हरभरा पिकाचे दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र प्रस्तावित केलेले असून यंदा हे क्षेत्र चांगलेच वाढणार आहे.

रब्बी हंगामातील पेरण्या रोडावल्या

जिल्ह्यात रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या पेरण्या रोडावल्या आहेत. यात आतापर्यंत जिल्ह्यात 46 हजार 424 हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या असून त्याची सरासरी अवघी 6 टक्के आहे. यासह 47 हजार 56 हेक्टरवर उसाची लागवड झालेली असून कांदा पिकांचे प्रमाण हे 39 हजार हेक्टरपर्यंत गेलेले आहे.

................

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com