विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अहमदनगर (Ahmednagar)

देशाची आणि जगाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय धोरणावर आधारित कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहिर केले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राने विद्यार्थ्यांना संशोधनावर आधारित शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतपाटील यांनी आज येथे केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन समारंभ उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते बाबुर्डी घुमट येथे पार पडला, त्यानंतर न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयाच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात‍ उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु संजीव सोनवणे, अधिसभा सदस्य राजेंद्र विखे पाटील, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉ.नंदकुमार सोमवंशी, बाबुर्डी घुमटच्या सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभाणे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मूळ भारतीय नागरिक श्रम करणारा असून त्याला अनुदानावर जगण्याची सवय नाही. तथापि, त्यासाठी व्यवसायाभिमूख शिक्षण आवश्यक आहे. विद्यापीठाचे विकेंद्रीत प्रशासन त्या-त्या भागातील गरजेनुसार शिक्षणक्रमाची अंमलबजावणी करते त्यामुळे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. भारतामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेली गुरुकुल शिक्षण आदर्श शिक्षण पध्दती होती. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सर्वगुण संपन्न विद्यार्थी तयार होणार आहे, यासाठी उपकेंद्रांची आवश्यकता असून त्यामध्ये प्रामुख्याने कृषी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर आधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

संशोधनामुळेच देशाने कोविड आजारावर लस तयार केली. त्यामुळे भारतासह जगातील इतर साठ देशांच्या नागरिकांचे प्राण वाचले. अशाप्रकारच्या संशोधनारीत शिक्षणामुळे भारताची विकासात्मक घौडदौड होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले, विद्यापीठांतर्गत शिक्षणाच्या कामासाठी पुणे येथे जावे लागत होते, गेल्या वीस ते बावीस वर्षाच्या अथक प्रयत्नांना यानिमित्ताने यश मिळत आहे. यामुळे प्रशासकीय कामात गतिमानता येऊन ते सुलभ होणार आहे. गत काळात विद्यापीठ कायद्यामधील बदलाच्या माध्यमातून स्वायत्तता धोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते जनतेला मान्य नव्हते त्यामुळे अंमलात येऊ शकले नाही. देशात जवळपास चाळीस वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पंतप्रधानांनी जाहिर केले आणि ते अंमलात आणले हे दूरगामी परिणाम करणारे आहे. जगाच्या पाठीवर होणारे बदल स्विकारण्यासाठी विद्यापीठांनी आपली दारे उघडी केली आहेत.

कोचिंग क्लासेसने, महाविद्यालये चालवायला घेतली त्यामुळे शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे, हे चिंताजनक असून ते राज्यकर्त्यांचेही अपयश असल्याचे सांगून मंत्रीमहोदयांनी याला अटकाव घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विद्यापीठाने आपल्या कार्यपध्दतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे असे सांगून, भविष्यात उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठामध्ये रुपांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. उपकेंद्रासाठी बाबुर्डी घुमट गावातील सुमारे 80 एकर जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच तानाजी परभाणे यांचा मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना उपकेंद्राद्वारे नवीन आधुनिक तंत्राज्ञानानेयुक्त रिन्युएबल एनर्जीवर आधारित अभ्यासक्रम राबविण्यात यावेत अशी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी केले. कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन

तत्पूर्वी, सकाळी बाबुर्डी घुमट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलआणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाबुर्डी घुमट गावाच्या सरपंच नमिता पंचमुखी, उपसरपंच तानाजी परभाणे, प्र-कुलगुरू प्रा.डॉ संजीव सोनवणे, अधिसभा सदस्य राजेंद्र विखे पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

भूमिपूजन कार्यक्रमानंतर, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत बाबुर्डी घुमट गावातील तीन शेतकऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते बीएचपी ट्रॅक्टरची कागदपत्र व किल्ल्यांचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत मंडळ कृषी अधिकारी, वाळकी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना 1 लाख 25 हजार रुपये अनुदान रक्कम देण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले उपस्थित होते.

ग्रामस्थांनी काही जागा परत मागितली

उपकेंद्रासाठी बाबूर्डी येथे 83 एकर जमीन घेण्यात आलेली आहे. त्यापैकी काही जमीन ग्रामपंचायतीला शैक्षणिक कामासाठी हवी आहे. ती दिली जाईल. राधाकृष्ण विखे पा.महसूलमंत्री असल्याने त्यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिक्षणाचा बाजार थांबवण्याची गरज

सध्या काही खासगी कोचिंग क्लास यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. त्यांनी महाविद्यालयाच भाडेत्तत्वावर चालवण्यास घेतली असून येणार्‍या उत्पन्नातून संस्थांचा चालकांना 30 टक्के तर उर्वरित खागसी कोचिंग क्लासवाले 70 टक्के रक्कम घेत आहेत. यामुळे शिक्षण संस्था चालकांनी आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. तसेच विद्यापिठांनी देखील व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. महाविद्यालयांना स्वयत्तता दिली म्हणजे विद्यापिठांची जबाबदारी संपली असे होत नाही, बाजारात उपलब्ध नोकर्‍या आणि आपण काय शिकवतो हे पाहिले पाहिजे. शिक्षणाची मक्तेदारी आमची आहे, विद्यापिठांनी समजू नये, या शब्दांत मंत्री विखे यांनी कान टोचले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com