नगरमधील 30 हजार घरे धोक्यात येणार?

आमदारांनी का घेतली मंत्र्यांकडे धाव?
नगरमधील 30 हजार घरे धोक्यात येणार?

अहमदनगर | प्रतिनिधी

सिंचन विभागाने (Irrigation Department) सीना नदीची (Sina river) पूररेषा आखून त्याप्रमाणे विकास किंवा बांधकाम परवानगीबाबत सूचित केले आहे. या प्रस्तावित पूररेषेमुळे शहरातील मोठ्या भूभागाचा विकास बाधित होणार आहे. बाधित क्षेत्रावर कोणत्याही बांधकामास परवानगी मिळणार नाही.

सुमारे 30 हजारांपेक्षा जास्त घरांना महापालिकेची (Ahmednagar Municipal Corporation) आधीच परवानगी दिलेली आहे. ती घरेही नव्या पूररेषेमुळे पुराचा धोक्यात दाखल झाली आहेत. हा नगरकरांवर एकप्रकारे अन्याय आहे. त्यामुळे पूररेषेचा नगरच्या विकासात खोडा घालू नये. याबाबत फेर सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे (Jayant Patil) करून हा विषय ऐरणीवर आणला आहे. मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली तेव्हा मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) सोबत होते.

आ.जगताप यांनी आपल्या पत्रात अनेक मुद्यांचा उल्लेख केला आहे. अहमदनगर शहर (Ahmednagar city) हे ऐतिहासिक शहर असून या शहराची स्थापना पाचशे वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपूर्वी झाली. तत्कालीन सत्ताधीश अहमदशहा यांनी अहमदनगर हे शहर सीना नदीच्या पूर्व तीरावर वसविले. आता या शहराची वाढ मूळ शहराच्या पश्चिम उत्तर व दक्षिण अशा तीन दिशांना झाली. या वाढीमुळे सीना नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. अहमदनगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीची लांबी तब्बल 14 किमी आहे. अहमदनगर शहराचा 500 वर्षांचा इतिहास पाहिला तर शहरात सीना नदीच्या पूरामुळे मोठी जीवित अथवा वीत्त हानी झाल्याचे उदाहरण नाही. नदीचा उगम शहराजवळच असून हा सर्व दुष्काळी भाग आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसमान खूपच कमी आहे. त्यातच सुमारे 100 वर्षांपूर्वी या नदीवर पिंपळगाव - माळवी येथे धरण बांधण्यात आले. त्यामुळे पुराचा धोका अधिकच कमी झाला आहे. ही वस्तूस्थिती असूनही सिंचन विभागाने नुकतीच सीना नदीची पुररेषा आखून त्याप्रमाणे विकासकामे व बांधकाम परवानगी देण्याबाबत सूचित केले आहे. ही पुर नियंत्रण रेषा दोन्ही बाजूंनी मोठ्याप्रमाणात आतपर्यंत दर्शविण्यात आली आहे. त्यात अहमदनगर शहराचा फार मोठा भुभाग बाधित झालेला आहे. त्याचा शहराच्या विकासावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यातच शहराच्या पूर्वेस असणार्‍या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाने त्यांच्या क्षेत्रालगत असलेल्या जमिनींवरील विकासांवर अनेक निर्बंध लादलेले आहेत. शहरात काही संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तुपासून 300 मीटर अंतरावर बांधकाम करण्यास अनेक निर्बंध आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या प्रस्तावित पूररेषेमुळे शहरातील मोठ्या क्षेत्रावर नवे निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. अनेक शेतकरी व नागरिक या निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शासनाने अहमदनगर शहरातील सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेवावत फेरसर्वेक्षण करून बदल करण्याचा निर्णय घ्यावा.

आ.संग्राम जगताप

Related Stories

No stories found.