अहमदनगर, श्रीरामपूर, राहुरीमध्ये श्रावणसरींची जोरदार बरसात

पिकांना पुन्हा एकदा जीवदान, शेतकर्‍यांना दिलासा
अहमदनगर, श्रीरामपूर, राहुरीमध्ये
श्रावणसरींची जोरदार बरसात

श्रीरामपूर, राहुरी |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर श्रीरामपूर, राहुरी व नगर तालुक्यात गोकुळ अष्टमी व पूर्वा नक्षत्राची एण्ट्री यांचा मुहूर्त साधून श्रावणसरींनी सर्वदूर जोरदार बरसात केली. सुमारे तासाभराहून अधिक वेळ पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा खूश झाले आहेत. राहाता, नेवासा, कोपरगाव व अन्य तालुक्यांत रिमझीम पाऊस सुरू होता.

अहमदनगर येथे रात्री 8 वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला होता. श्रीरामपूर शहर व तालुक्यात दुपारनंतर पावसाळी वातावरण झाले. त्यानंतर सुरूवातीला रिमझीम सुरू होती. 5 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाचा जोर वाढला. बेलापूर, हरेगाव, उंदिरगाव, टाकळीभान, निपाणी, कारेगाव, उक्कलगावसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कपाशी, सोयाबीन, मका व अन्य पिकांना दिलासा मिळाला आहे.

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात वळण, मानोरी, मांजरी, आरडगाव, ब्राह्मणी, उंबरे परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. तर देवळाली प्रवरा, वांबोरी, राहुरी फॅक्टरी, टाकळीमिया, बारागाव नांदूर, सोनगाव, सात्रळ, कोल्हार खुर्दलाही पावसाने मुसळधार हजेरी लावून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे जनजीवन गारठून गेले आहे. काल श्रावणी सोमवार त्यातच गोकुळ अष्टमीचा शुभमुहूर्त वरूणराजाने गाठून पूर्वा नक्षत्रावर दमदारपणे एण्ट्री केली.

दरम्यान, पावसामुळे नगर-मनमाड महामार्गावर मोठे खड्डे पडले असल्याने अपघातात वाढ झाली असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातही रस्ते नादुरूस्त झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. राहुरी शहरातही सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. सुमारे दोन तासाहूनही अधिक वेळ पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होेते. तर ग्रामीण भागात अनेक शेतात पाणी साचल्याने शेतीला शेततळ्याचे स्वरूप आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com