
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतीसाठी रविवार (दि. 17) रोजी 82 टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर जिल्ह्यातील मतदारांना निकालची उत्सुकता होती. काल झालेल्या मतमोजणीनंतर नगर दक्षिणेत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. यात नगर तालुक्यात शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीला रोखण्यात यश मिळवले आहे. तर श्रीगोंदा तालुक्यात भाजपचे आ. बबनराव पाचपुते यांना पुतण्याने अस्मान दाखवत त्यांचा चिरंजीव प्रताप पाचपुते यांचा पराभव केला.
दुसरीकडे शेवगावमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या असून पाथर्डी तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे पाटील यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. तिकडे कर्जत तालुक्यात आ. रोहित पवार आणि भाजपचे आ. राम शिंदे या दोघा दिगग्जांमध्ये उध्दव ठाकरे गटाच्या समर्थकांनी दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. अशाप्रकारे नगर दक्षिण जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे संमिश्र निकाल हाती आले आहे.
नगर तालुक्यात भाजपच्या शिवाजी कर्डिल समर्थकांनी 26 पैकी 18 ग्रामपंचातींवर वर्चस्व मिळवले आहे. तर तालुक्यात महाविकास आघाडीला अवघ्या 8 ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाले. श्रीगोंदा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांचा त्यांचा पुतण्या साजन पाचपुते याने काष्टी ग्रामपंचाय निवडणुकीत पराभव केला. पाचपुते यांचा स्वत:च्या गावातील पराभव त्यांना जिव्हारी लागणार आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या पुत्राची राजकारणात एंट्री झाली असून बेलवंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ऋषिकेश आण्णासाहेब शेलार विजयी झाले आहेत. तर बनप्रिंपरी ग्रामपंचात सलग दुसर्या बिनविरोध करत माजी आ. अरूण जगताप आणि सचिन जगताप यांनी गावावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तालुक्यात सर्वाधिक 9 ग्रामपंचायती या राष्ट्रवादीकडे तर काँग्रेसकडे 1 ग्रामपंचायत असून भाजपच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत आलेली नाही.
कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आणि विधान परिषदेचे आ. राम शिंदे या दोघा दिगग्जांच्या लढाईत उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.भैरवाडी आणि कौंडाणे असे ठाकरे गटाच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायातींची नावे आहेत. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या ताब्यात 15 वर्षापासून असणारी ग्रामपंचायत भाजपने काढून घेतली आहे. शेवगाव तालुक्यावर राष्ट्रवादीचा वर्चस्व दिसून आले. तर दोन ठिकाणी जनशक्ती पक्षाला यश आले आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावत लवांडे गटाचा पराभव केला आहे. तर भालगावात भाजपचे तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचा भाजपच्या दुसर्या गटाने पराभव केला आहे. पारनेर तालुक्यात 12 ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आल्याचा दावा समर्थकांनी केला असला तरी आ. नीलेश लंके यांचे समर्थक अॅड. राहुल झावरे यांची ग्रामपंचायत आणि बाबा तरटे यांच्या मंडळाचा पराभव आ. लंके गटासाठी धक्कादायक मानला जात आहे. जामखेड तालुक्यात दोन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे तर एकावर भाजपचे वर्चस्व आहे.