शहर बँकेतील सोनेतारण फसवणुकीबद्दल खासगी फिर्याद

येत्या 9 नोव्हेंबरला होणार सुनावणी
शहर बँकेतील सोनेतारण फसवणुकीबद्दल खासगी फिर्याद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट सोने तारण प्रकरणी फसवणुकीस सहाय्य केले म्हणून नगर शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांसह अन्य आरोपींविरुद्ध न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहर सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना सत्ताधार्‍यांविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाल्याने खळबळ उडाली असून तो चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, या खासगी खटल्याची पहिली सुनावणी येत्या 9 नोव्हेंबरला होणार असल्याचे फिर्यादी निलेश चौरे यांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी, फिर्यादी चौरे यांच्या नावानेखोटे व बनावट खाते नगर शहर सहकारी बँकेत तयार करुन त्या खात्यावरखोटे सोने ठेवून व मोठी रक्कम कर्ज म्हणून उचलून फिर्यादी यांची फसवणूक केली. याविषयी फिर्यादी यांनी नगर येथील न्यायालयात खासगी खटला दाखल केला आहे. या खोटेपणाबद्दल बँकेचे पदाधिकारी, अधिकारी तसेच संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष माहिती होती व त्यांनीच आरोपींना खोटे प्रकारे गुन्हा करण्यास एक प्रकारे सहाय्य करुन प्रवृत्त केल्याचे निष्पन्न होत आहे, असा दावा या खासगी फिर्यादीत केला गेला आहे.

नगर शहर सहकारी बँकेत अशाप्रकारे जवळपास 10 ते 12 किलोपेक्षा अधिक खोटे सोने तारणावर कर्ज वितरण व्यवहार झालेले आहेत. त्याच त्याच व्यक्ती वारंवार अनेक वर्षांपासून असे व्यवहार करीत असल्याचे बँकेचे अधिकारी, पदाधिकारी यांना ज्ञात असताना त्यांनी हे प्रकरण झाकून ठेवले. तसेच या प्रकारास हस्ते-परहस्ते सहकार्य व मदत केली असल्याचा दावा फिर्यादी चौरे यांनी फिर्यादीत केला आहे. खोटे सोने ठेवून त्यावर कर्ज उचलणे, त्याचा बोभाटा होवू नये म्हणून ते खाते बार करुन हे खोटे सोने पतसंस्थेत ठेवणे व त्यावर पतसंस्थेकडून पैसे उचलणे व पुन्हा खोटे सोने सोडवून घेणे अशाप्रकारे व्यवहार करुन पतसंस्थेतील सोडवून आणलेले खोटे सोने पुन्हा शहर सहकारी बँकेत ठेवणे व त्यावर रकमा उचलणे, असे प्रकार झालेले आहेत. त्याच सराफाच्या मदतीने पतसंस्थेत देखील 10 ते 12 किलो खोटे सोने ठेवले असल्याचे म्हणणे फिर्यादी चौरे यांनी न्यायालयात दाखल तक्रारीत मांडले आहे तसेच त्याप्रमाणे फिर्यादी चौरे यांनी पोलिसांकडे जबाबही नोंदविला असल्याचे ही स्पष्ट केले आहे. या खासगी खटल्यात फिर्यादी निलेश चौरे यांच्यावतीने अ‍ॅड. अरुणा उनवणे-राशीनकर काम पाहत आहेत.

दोन उमेदवारी अर्ज दाखल

शहर सहकारी बँकेच्या 15 जागांसाठी 11 डिसेंबरला मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस झाले असून, या काळात केवळ दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बँकेचे विद्यमान संचालक संजय घुले यांनी सर्वसाधारण प्रतिनिधी व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी या दोन जागांसाठी दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com