अहमदनगर शहर सहकारी बँकेची 27 लाखांची फसवणूक

बनावट सोने तारण घोटाळा || चौघांविरूध्द गुन्हा
अहमदनगर शहर सहकारी बँकेची 27 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर सहकारी बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून त्यावर कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे. यात बँकेची सुमारे 27 लाखाची फसवणूक झाली आहे. शहर सहकारी बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (वय 33 रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (वय 28), ज्ञानेश्‍वर रतन कुताळ (वय 28 दोघे रा. चिपाडे मळा, सारसनगर) व सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (वय 38 रा. सदगुरु टॉवर्स, तपोवन रोड, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तिघांनी बनावट सोन्या व्यतिरिक्त इतर धातूच्या वस्तू तयार करून बँकेतील गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले यांच्याशी संगनमत करून त्या बनावट इतर धातूच्या वस्तू या खरे सोने आहे असे भासविले. तसेच बँकेत गोल्ड व्हॅल्युअर यांनी 17 मार्च 2022 रोजी सोनेतारण पावती बनावट अहवाल देऊन व सही करून त्या इतर धातूच्या वस्तू आहेत असे भासवून बँकेत गहाण ठेवून ज्ञानेश्‍वर कुताळ याने 20 लाख 75 हजार रूपये सोने तारण कर्ज घेतले. कर्ज तारण खातेधारक अक्षय रामदास निकाळजे यास पाच लाख 88 हजार रूपये कर्ज घेण्यास भाग पाडून बँकेची एकूण 26 लाख 63 हजार रूपये रकमेची सोने तारण कर्ज प्रकरणात फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, बनावट सोने तारण घोटाळा उघड होणारी शहर सहकारी बँक ही जिल्ह्यातील दुसरी सहकारी बँक आहे. याआधी नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतही सुमारे पाच कोटींचा बनावट सोनेतारण घोटाळा उघड झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार अभय कदम, बापुसाहेब गोरे, गणेश ढोंबळे, दीपक बोरूडे, अनुप झाडबुके, सलिम शेख, बंडु भागवत, सुमित गवळी, अतुल काजळे यांच्या पथकाने चौघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com