सदोष बियाणांच्या 336 तक्रारींकडे दुर्लक्ष
सार्वमत

सदोष बियाणांच्या 336 तक्रारींकडे दुर्लक्ष

शेतकर्‍यांना दुबार पेरणीचा भुर्दंड : 2006 पैकी 536 बियाणे पिशव्या बदलून दिल्या

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

खरीप हंगामात पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या एक हजारांच्या जवळपास तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने 800 शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जाऊन तपासणी केली आहे. यात 336 बियाणांमध्ये दोष आढळला असून याप्रकरणी कोपरगाव, राहाता आणि पारनेर वगळता अन्य ठिकाणी कारवाई झालेली नाही.

ही माहिती कृषी विभागाच्या अहवालात असून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई सोडता 2 हजार 64 सदोष बियाणे पिशव्यांपैकी अवघ्या 536 बियाणे पिशव्या बदलून देण्यात आल्या आहेत. यामुळे सदोष बियाणेप्रकरणी कृषी विभागाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यातून असून हंगाम सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यामुळे सदोष बियाणेप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना कधी न्याय मिळणार हा प्रश्न आहे.

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर खरीप हंगामात पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या. त्यावर कृषी विभागाने तपासणी करण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमली. या समित्यांनी पाहणी करून पंचनामे केल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. पण सोयाबीन, बाजरीचे बियाणे उगवले नसल्याबाबत तक्रार देणार्‍या शेतकर्‍यांना भरपाई मिळणार का, याचे उत्तर कृषी विभागाकडे नाही.

जिल्ह्यात विविध पिकांच्या पेरणीसाठी एकूण 35 कंपन्यांनी बियाणे पुरवठा केला आहे. पण आत्तापर्यंत केवळ दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे उगवण प्रश्नी कृषी विभाग गंभीर नसल्याचे दिसत आहे. तक्रारी केल्यापासून आतापर्यंत दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. पण अजून सुमारे दोनशे शेतकर्‍यांच्या बांधावर कृषी विभाग पोहचलेला नाही.

नगर जिल्ह्यात यंदा खरिपात निकृष्ट बियाणे पुरवठा झाल्याने सोयाबीन, बाजरीची उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत एक हजार तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. यामुळे जवळपास 850 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. यातील 800 तक्रारींपर्यंत कृषी विभाग पोहचला आहे. प्राप्त तक्रारीनुसार शेतकर्‍यांना जवळपास 2 हजार 64 सदोष बियाणे पिशव्या मिळाल्यात, यातील 536 पिशव्या बदलून दिल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यासह आर्श्चयकारक म्हणजे 277 शेतकर्‍यांनी तक्रारी पुन्हा मागे घेतल्या आहेत.

यात 336 सदोष बियाणे आढळून आलेले आहेत. याप्रकरणी संबंधित शेतकर्‍यांना भरपाई मिळणार की नाही, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालात कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यात सदोष बियाणेप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. उर्वरित ठिकाणी गुन्हे दाखल झाले की नाही, याचा तपाशील कृषी विभाग दडवित आहे. त्यांच्या अहवालात 11 तालुक्यांतील अहवाल अप्राप्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांनी हंगाम सुरू झाल्यापासून तक्रारी केल्या असून त्याला आता जवळपास दीड महिना होत आला असून काही दिवसांनंतर तक्रार करणारे शेतकरी थंड होण्याची वाट कृषी विभाग पाहत असल्याची शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

गोषवारा- प्राप्त तक्रारी 991, तपासणी 800, माघारी घेतलेल्या तक्रारी 277, बाधित बियाणे पिशवी 2 हजार 84, बदलून दिलेल्या बियाणे पिशवी 536, सदोष बियाणे 336, राहाता, कोपरगाव आणि पारनेर वगळता अन्य ठिकाणी करावाईचा अहवाल प्राप्त नाही.

सदोष बियाण्यामुळे पीक उगवले नाही, फसवणूक झाली म्हणून कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेऊन कोपरगाव, राहाता आणि पारनेर येथे कंपनी प्रतिनिधी, बियाणे विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल केले, पण या गुन्ह्यांचा पुढील तपास अजूनही ठप्प आहे. कृषी विभाग पुढाकार घेऊन पोलिसांना तपासासाठी आवश्यक पुरावे उलब्ध करून न्याय देणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रारी - सोयाबीन - 640, बाजरी - 320, कांदा - 26, भुईमूग - 2, तूर, टोमॅटो, वाटाणा - प्रत्येकी 1 एकूण -991 आणि एकूण बाधित क्षेत्र - 813 हेक्टर आहे.

Deshdoot
www.deshdoot.com