शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे, कोल्हापूरनंतर नगरचा झेंडा

राज्यात तिसर्‍या स्थानावर : पाचवी व आठवीचे एकूण 10 हजार 726 विद्यार्थी पात्र
शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे, कोल्हापूरनंतर नगरचा झेंडा

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याच्या निकालात कमालीची सुधारणा झाली आहे.

या परीक्षेच्या निकालात पुणे राज्यात पहिल्या स्थानावर, कोल्हापूर दुसर्‍या तर नगर जिल्हा हा तिसर्‍या स्थानावर आहे. जिल्ह्यातील पाचवीचे 8 हजार 236, तर आठवीचे 2 हजार 490 असे एकूण 10 हजार 726 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळांतील मुलांनी ही परीक्षा द्यावी, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून आवाहन केले जाते.

यंदा ही परीक्षा 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती. त्याचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 7 नोव्हेंबर रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला. यात पाचवी व आठवीचा जिल्ह्याचा निकाल अनुक्रमे 27.29 व 13.23 टक्के लागला. 2021 मध्ये हाच निकाल अनुक्रमे 15.72 व 12.43 टक्के होता. त्या तुलनेत यंदा निकालात अनुक्रमे 12 टक्के व 2 टक्के वाढ झाली आहे. निकालात जिल्ह्याचा राज्यात पाचवी व आठवी अनुक्रमे 11 वा व 14 वा क्रमांक असला तरी, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र होण्यामध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

तत्कालीन अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांच्या कार्यकाळात आणि शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सुमारे 30 ते 32 लाख रुपयांचा परीक्षा शुल्क भरण्यात येत आहे. त्यावेळी घेतलेल्या या निर्णयाचे फलीत आता दिसू लागले आहे. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर असल्याने झेडपीच्या शाळांच्या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

24 शाळांचा निकाल 100 टक्के

पाचवीमध्ये 24 जिल्हा परिषद शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून 220 गुणांच्या पुढे 356 विद्यार्थी आहेत. आठवीमध्ये 180 गुणांच्या पुढे 17 विद्यार्थी आहेत. 210 शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. मागील वर्षी 490 शाळा शून्य टक्क्यांवर होत्या. यंदा त्या निम्म्याने कमी झाल्या आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हास्तरावरून ऑनलाईन व ऑफलाईन 11 सराव परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात प्रगती झाली आहे. भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर आणखी लक्ष केंद्रीत करून निकाल वाढण्यासाठीपर्यंत करणार आहे.

- भास्करराव पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

गुणपडताळणीसाठी दि. 17 पर्यंत संधी

शाळा आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग-इनमधून तसेच पालक आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉग-इनमध्ये 17 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण अभ्यासक्रम आदी दुरुस्तीसाठी 17 नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com