
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
औरंगजेबच्या उदात्तीकरणावरून आता राजकीय वाद पेटलाय. अशा चुकीच्या गोष्टींना धार्मिक रंग देण्यास सत्ताधार्यांचंच प्रोत्साहन आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला. त्यावर विरोधकांकडूनच अशा गोष्टींना फूस दिली जात असल्याचा पलटवार फडणवीसांनी केला. औरंगजेबची भलावण करणार्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच असं फडणवीसांनी ठणकावलंय.
राज्यात नगर, संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधार्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे?
ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरणाच्या घटना या कनेक्शनची चौकशी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, असा सवालही त्यांनी केला.
नवी मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. नवी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात, दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाच्या घटना घडतात, याचे मला आश्चर्य वाटते. या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानक कोण पुढे आले आणि त्यांना कोणाची फूस आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे.
संपूर्ण चौकशीअंती त्यावर सविस्तर बोलेनच. पण, विरोधकांच्या दंगलीच्या वक्तव्यानंतर अनेक जिल्ह्यांत औरंगजेबाचे उदात्तीकरण हा काही साधा योगायोग नाही, याच्या खोलात आम्ही जाऊ. सार्याच लोकांचे एका सुरात बोलणे आणि त्याला लगेच एका विशिष्ट समाजातून त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचे उदात्तीकरण, हा योगायोग असूच शकत नाही. औरंगजेब कुणाला जवळचा वाटतो, हे आपल्या सर्वांना ठावूक आहेच, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, याचा शोध घ्यावा लागेल. याच्या मागे कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल. जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी तर अशा अवलादी पैदा केलेल्या नाहीत ना, याचाही शोध घेतला जाईल. कोल्हापूरमध्ये परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलीस बंदोबस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कायदा हाती घेऊ नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे औरंग्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही आणि असे करणार्यांना माफी नाहीच, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राचे नाव खराब कोण करतेय आणि या घटनांच्या मागे बोलविते धनी कोण, हेही आम्ही शोधून काढू. पण, कायदा कुणी हातात घेतला, तर कारवाई केली जाईल. औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर संताप होतोच. पण, त्याचा अर्थ कायदा हातात घ्यायचा असे नाही, असेही त्यांनी बजावले.