नगरमध्ये 12 लाखांचे चंदन पकडले

दोघांना अटक: कारमधून करत होते वाहतूक
नगरमध्ये 12 लाखांचे चंदन पकडले

अहमदनगर|Ahmedagar

इनोव्हा कारमधून चंदनाची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 11 लाख 84 हजार रूपये किंमतीच्या 370 किलो चंदनाचे लाकडे, कार, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 18 लाख 96 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कार चालक सुभाष भिमराज दिलवाले (वय 47) व राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 30, दोघे रा. चिचोंडी पाटील ता. नगर) अशी पकडलेल्या चंदनतस्करांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379,34 सह भारतीय वन अधिनीयम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) व महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरूवारी पहाटे अहमदनगर शहरातील सैनिक लॉन गेट समोरील परीसरात ही कारवाई केली.

इनोव्हा कारमधून चंदनाची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भिंगारदिवे, दीपक रोहकले, सलिम शेख, गणेश धोत्रे, संतोष गोमसाळे, अमोल गाढे, सोमनाथ राउत, अभय कदम, अतुल काजळे यांनी पहाटे एक वाजेपासूनच चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीसकडे जाणार्‍या रोडवर सैनिक लॉन गेट समोरील परीसरात सापळा लावला. खबर मिळाल्यानुसार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राखाडी रंगाची इनोव्हा कार (क्र. एमएच 12 जेयू 5644) पोलिसांनी रोखली. कारची झडती घेतली असता प्लॅस्टीकच्या 17 गोण्यांमध्ये भरलेले 370 किलो चंदन लाकूड हाती लागले. बाजारभावानुसार त्याची किंमत 11 लाख 84 हजार रूपये आहे. पोलिसांनी कारसह चंदन, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com