अहमदनगर (प्रतिनिधी) -

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठे याच्यापासून आमच्या जिवीताला धोका असून त्याला अटकपूर्व जामीन देवू नका,

अशी मागणी जरे कुटुंबियांच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी होणार्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपी अटक केले आहे. त्यांच्या चौकशीत जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार हा बाळ बोठे असल्याचे समोर आले. आरोपीत नाव येताच तो पसार झाला. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी म्हणणे दाखल करण्यास मुदत मागितली तर पोलिसांनी बोठेला सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी न्यायालयाकडे केली. या सगळ्या प्रकरणावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, जरे कुटुंबियांच्यावतीने न्यायालयात वकिलपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याबरोबरच शपथपत्रही दाखल केले आहे. बोठे याच्यापासून आमच्या जीविताला धोका असल्याची तक्रार रुणाला जरे यांनी अगोदरच पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. त्याच अनुषंगाने बोठे याला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली असल्याचे समजते.