अहमदनगर (प्रतिनिधी) -
सध्या बाजारात लाल कांद्याची आवक सुरू झाली असून भावही चांगले आहेत. शनिवारी (दि. 12) झालेल्या लिलावात नगर
बाजार समितीत लाल कांद्याला साडेचार हजारापर्यंत भाव निघाला. मात्र, लाल कांद्याचे सरासरी उत्पन्न कमी असल्याने मिळणारा भाव देखील कमी असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
मागील आठवड्यात दिवसांपूर्वी तीन हजारांच्या खाली भाव घसरलेल्या कांद्याने पुन्हा उसळी घेतली असून गुरुवारी व आता शनिवारच्या लिलावात लाल कांदा साडेचार हजारांपर्यंत विकला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी लाल कांद्याची आवक दहा हजार क्विंटल होती. ती आता वाढून शनिवारच्या लिलावात 26 हजार 675 क्विंटल झाली. यामध्ये प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 3 हजार 500 ते 4 हजार 500 प्रति क्विंटलचा भाव निघाला. गावरान कांद्याचेही दर टिकून आहेत. मात्र पूर्वीपेक्षा आता गावरान कांद्याची आवक कमी होत आहे. शनिवारच्या लिलावात 13483 क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली आणि यामध्ये प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 2 हजार 800 ते 3 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
दरम्यान, यंदा परतीचा आणि अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे सरासरी उत्पन्न घटले आहे. सलग पावसामुळे अनेक ठिकाणी लाल कांदा साडला असून काही ठिकाणी वाढ कमी झालेली आहे. लाल कांदा खर्चिक पिक असल्याने त्याला पाच हजारांच्या पुढे भाव मिळाल्यास शेतकर्यांना फायदा होतो.
................
शनिवारचे लिलावा गावरान कांदा
प्रथम प्रतवारी 2 हजार800 ते 3 हजार500, द्वितीय 2 हजार 200 ते 2 हजार 800, तृतीय 1 हजार ते 2 हजार 200 आणि चतुर्थ 500 ते 1 हजार
........................
लाल कांदा लिलाव
प्रथम प्रतवारी 3 हजार 500 ते 4 हजार 500, द्वितीय 1 हजार 850 ते 3 हजार 500, तृतीय 1 हजार ते 1 हजार 850 आणि चतुर्थ 500 ते 1 हजार.
.....................