नद्यांना पूर, नगर जिल्हा चिंब; जनजीवन विस्कळीत

File Photo
File Photo

अहमदनगर (प्रतिनिधी)

हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून मोठया प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे त्यात गुजरातमधील कमी दायाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागासह नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निकवड तसेच नाशिकमधील दारणा, गंगापूर, पुण्यातील कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटातह लाभक्षेत्रात गुरूवारी रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने प्रवरा, मुळा, घोड या नद्यांना छोटे पूर आले आहेत. तर गोदावरी दुथडी वाहत आहे. श्रीरामपूर नगर राहुरीसह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

डिंभे धरणातून २२००० क्युसेक विसर्ग

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आहपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पावसामुळे घोड नदी व बुब्रा नदीला पूर आला आहे. या पुरात | माळीन फाट्यावर आंबडे येथील नागरीक चंद्रकांत काळू असवले ( वय ४८ वर्ष) हे पुरात वाहून गेले आहेत. त्यांचा दुपारपर्यंत शोध लागला नाही. डिंभे धरणातून पाचही दरवाजातून २२००० क्युसेस ने घोड नदी पात्रात दुपारी एक वाजल्या पासून पाणी सोडण्यात येत आहे.

घोड नदी व बुब्रा नदीला पूर आल्यामुळे त्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्या धरणात २२ हजार क्युसेसनी पाण्याची आवक सुरू असून धरणातून तेवढेच पाणी घोड नदीपात्रात सोडले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुकडी समूह प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा २७७९४ दलघफू (९३.६५ टक्के) आहे.

मुळातून २०००० क्युसेकने विसर्ग राहुरी, कोतूळ येथील प्रतिनिधीने कळविले की, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणलोटात मुळातील पाणी सातत्याने वाढत आहे. काल सायंकाळी कोतूळ येथील विसर्ग २०८२८ क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे मुळा धरणात जोमाने नवीन पाण्याची आवक होत आहे. २६००० दलघफू क्षमतेच्या या धरणात पाणीसाठा २५६५० दलघफू कायम ठेवण्यात येऊन धरणातून खाली नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. काल दुपारी १२ वाजता १०००० क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यानंतर दुपारी १ वाजता १५००० क्युसेक करण्यात आला. त्यानंतर रात्री ८ वाजता हा विसर्ग २०००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

बहुतांश शाळांना सुट्टी

अकोले, भंडारदरा (प्रतिनिधी)- भंडारदरा-निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रवरेला पूर आला आहे. प्रवरा नदीवरील सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अकोले शहरातील स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली होती. याशिवाय रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या ओढ्या नाल्यांच्या पाण्याने शहरालगतच्या अकोले- परखतपूर, अकोले-धामणगाव रस्त्याच्या सुरुवातीला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले. रात्री ९ वाजता निळवंडे धरणातून १९३१८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. शहरातील देवठाण रस्त्यावरील मोठ्या पुलावरून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती. अकोले शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री पासून कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस कोसळत होता. या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाणे अवघड होऊन बसले होते, त्यामुळे | शहरातील व परिसरातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली | होती. भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असून घाटघरमध्ये आठ इंच पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून काल सायंकाळी १०९९२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. वाकीचा ओव्हरफलो ७८९ क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे निळंवडे धरणातून १८९०४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच अन्य ओढे नाल्याचे पाणी प्रवरा नदीत येऊन मिसळत आहे.

भंडारदरा पाणलोटात गत २४ तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) - भंडारदरा १५५, घाटघर १९६, रतनवाडी १६४, वाकी ११९.

गोदावरी पुन्हा दुथडी

राहाता (तालुका प्रतिनिधी) - गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने धरणामधील विसर्ग वाढविण्यात आले आहेत. यामुळे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने काल रात्री ८ वाजता ३८३४५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. गेल्या दोन तीन दिवसांपासून दारणा, गंगापूरच्या पाणलोटात तसेच नाशिक भागात पावसाची संततधार सुरू आहे. आधिच धरणे तुडूंब असल्याने नवीन येणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दारणातून १०५६२ क्युसेक, मुकणेतून १४८६ क्युसेक, कडवातून ७६३२ क्युसेक, वालदेवीतून ४०७ क्युसेक, गंगापूर मधून १६०८ क्युसेक, आळंदीतून ४४६ क्युसेक, भोजापूर मधून २८०० क्युसेक, पालखेड मधून ६८२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वरील धरणांमधून जवळपास ३१ हजार क्युसेक तर निफाड भागातील | पावसाचे पाणी असे एकूण पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने या बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीत काल संध्याकाळी ८ वाजता ३८३४५ क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. काल सकाळी संपलेल्या मागील २४ तासांत दारणाच्या भिंतीजवळ ५५ मिमी, इगतपुरी येथे १२३ मिमी, गंगापूरला ९८, त्र्यंबकला ५२, अंबोलीला १००, कश्यपी ५४, मुकणे ६८, भाम ९७, भावली १५७ मिमी, असा पाऊस नोंदला गेला. या शिवाय काल दिवसभरही पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे पाण्याची मोठी आवक धरणात होत आहे.

जायकवाडीतून ७५९५६ क्युसेकने विसर्ग!

गोदावरीतून ३८३४५ क्युसेक, मुळातुन २० हजार क्युसेक, प्रवरातून २० हजार क्युसेक असा विसर्ग खाली जायकवाडी च्या दिशेने जात आहे. या शिवाय मार्गातील सामावणारे पाणी | आणि मराठवाड्यातील पाणी असे पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत होते. काल संध्याकाळी ८ च्या आकडेवारीनुसार जायकवाडीत ७५९५६ क्युसेक ने नवीन पाण्याची आवक होत होती. आणि विसर्गही ७५९५६ क्युसेक ने करण्यात येत होता. या विसर्गात काहिशी वाढ होऊ शकते. जायकवाडीत ९८.६८ टक्के पाणी साठा स्थिर ठेवुन नवीन पाण्याचा विसर्ग खाली गोदावरीत करण्यात येत होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com