बाप्पा पावले! नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

77 महसूल मंडळात दमदार, 17 मंडळात अतिवृष्टी; सर्वाधिक नेवासा, कोळगावमध्ये प्रत्येकी 115 मि.मी. नोंद
पाऊस
पाऊस

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

प्रदीर्घ खंडानंतर विघ्नहर्ता गणपती बाप्पा जिल्हावासीयांना पावला आहे. गुरूवारी सायंकाळी (दि.21) ते शुक्रवार (दि.22) पहाटेच्या दरम्यान जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 97 महसूल मंडळांपैकी 77 ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. यातील 17 महसूल मंडळात 65 मिली मीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून यात सर्वाधिक नेवासा तालुक्यातील नेवासा बु आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव मंडळात प्रत्येकी 115 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी रात्रीही श्रीरामपूर, राहुरी, राहाता व अन्य भागात पावसाची संततधार सुरू होती.

पाऊस
श्रीरामपूर दरोडा प्रकरणी खळबळजनक खुलासा! दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीनेच आवळला पतीचा गळा

दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामातील तूर आणि मका वगळता अन्य पिकांना फारसा फायदा होणार नाही. मात्र, गणेशोत्सवाच्या उर्वरित कालावधीत असाच पाऊस सुरू राहिल्यास त्याचा फायदा रब्बी हंगामातील ज्वारी पिकाला होणार आहे. जिल्ह्यात गोकुळ आष्टीमीपासून ज्वारीच्या पेरणीला सुरूवात झाली असून ज्याठिकाणी पाणी आहे, त्याठिकाणी शेतकर्‍यांनी रब्बी ज्वारी पेरणीस सुरूवात केली असली तरी रब्बी हंगामाची सारी भिस्त ही परतीच्या पावसावर अवलंबून राहणार आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा, कुकडी, दारणा धरणांच्या पाणलोटातही पाऊस वाढल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढू लागली आहे.

गुरूवारी सायंकाळी उशीरा नगर दक्षिणेतील श्रीगोंदा, शेवगाव, उत्तरेतील नेवासा, कोपरगाव या तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्री उशीरापर्यंत अकोले वगळता उर्वरित सर्व तालुक्यात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर, श्रीगोंदा शहर आणि परिसर, बेलवंडी, कोळगाव, माहिजळगाव. शेवगाव तालुक्यातील शेवगाव शहर, बोधेवगाव, चापडगाव, भातकुडगाव, एरंडगाव, पाथर्डी तालुक्यातील मीरी, नेवासा तालुक्यातील नेवासा बु, सलाबतपूर आणि कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव महसूल मंडळात 65 मिली मिटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

यासह नालेवगाव, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेउर, चिंचोडीपाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी. पारनेर, भाळवणी, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळी, पळशी. श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, चिंबळा, देवदैठण, कोळगाव, कर्जत, मिरजगाव. अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, शेवगाव, भातकूडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजगाव, एरंडगाव. पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी, नेवासा बु, नेवासा खु, सलाबतपूर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, वडाळा. राहुरी, सात्रळ, ताराबाद, देवळाली, टाकळीमियॉ, ब्राम्हणी, वांबोरी. आश्‍वी, सीबलापूर, तळेगाव, समानापूर, घारगाव, डोळसणे, साकूर, पिंपळणे. कोपरगाव, रवंदेख, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव. श्रीरामपूर, बेलापूर, उंदिरगाव, टाकळीभान. राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, पुणतांबा या ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.

दुसर्‍या दिवशी नगरमध्ये रिमझिम

शुक्रवारी दुपारी एकपासून नगर शहरात दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी बरसत होत्या. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी डबक्यात पाणीसाठले होते. आधीच नगर शहरातील रस्त्यांची वाट लागलेली असून त्यात पावसाचे पाणीसाठल्याने नगरकरांची तारंबळ झाली. गणेशोत्सव सुरू असून सलग दुसर्‍या दिवशी पाऊस झाल्याने उत्सव साजर्‍या करणार्‍या मंडळाची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. मात्र, तरी देखील आणखी पाऊस यावा, अशी प्रार्थना मंडळाच्यावतीने बाप्पांना करण्यात येत होती.

पाऊस
काय सांगता! लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी... पाहा VIDEO

डिंभे पुन्हा तुडूंब

पाणलोटात पावसाचा काहीसा जोर वाढल्याने कुकडी प्रकल्पातील सर्वांत मोठे धरण असलेले डिंभे धरण काल शुक्रवारी दुपारी दुसर्‍यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्यात येत आहे. 13500 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल दुपारी पूर्ण क्षमतेने भरले. तरीही पाणी येत असल्याने कालव्यातून पाणी सोडण्यात येत होते. येडगाव धरणात 45 टक्के, माणिकडोह 74 टक्के वडजमध्ये 95 टक्के तर पिंपळगाव जागे धरणात 88 टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात या धरणातील पाणीसाठा मायनस होता. दरम्यान, काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत समूह धरणात एकूण 504 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने एकूण उपयुक्त पाणीसाठा 25257 दलघफू(85.11 टक्के) झाला होता. गतवर्षी एकूण पाणीसाठा 28124 दलघफू (95 टक्के) पाणी होते. यंदा दहा टक्के पाणीसाठा कमी आहे.

मुळात आवक वाढली

कोतूळ (वार्ताहर) : नगर शहर, एमआयडीसी, राहुरी, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटातही पाऊस वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. काल सकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 2247 क्युसेक होता. त्यानंतर पाऊस कमी झाल्याने तो सायंकाळी 1393 क्युसेकपर्यंत घटला होता. पण रात्री पुन्हा पावसाचा काहीसा जोर वाढल्याने नदीतील पाणी वाढले होते. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 20400 दलघफू होता धरणातून 1550 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

निळवंडे भरण्याच्या मार्गावर

भंडारदरा (वार्ताहर) : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण दुसर्‍यांदा ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातील विसर्ग निळवंडे दाखल होत असल्याने हेही धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. पाणलोटात काल शुक्रवारी रात्री 7 वाजेनंतर संततधार सुरू होती. त्यामुळे रात्री 9.15 वाजता स्पिलवेतूनही 609 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. विद्युतगृह क्र.1 मधून 820 असे एकूण 1429 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडेत आज शनिवारी अधिक पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. भंडारदरा पाणलोटात घाटघर आणि रतनवाडीत पावसाचा जोर वाढल्याने धरणात काल दिवसभरात 35 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले हे पाणी निळवंडेत जमा झाले. त्यामुळे 8320 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 7982 दलघफू (95.36टक्के) झाला होता. भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 10 मिमी झाली आहे. भंडारदरा धरणातून 820 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वाकी तलावातूनही पुन्हा 197 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक लक्षात घेता आज शनिवारी या धरणातील पाणीसाठा 97-98 टक्क्यांवर पोहचण्याची शक्यता आहे.

भांडण सोडविण्यास गेलेल्या माजी सरपंचाना टारगटाकडुन अरेरावीची भाषा, करजगावात तणावाचे वातावरण

गोदावरीत 10345 क्युसेकने विसर्ग

राहाता (तालुका प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सलग दोन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने धरणात नवीन पाणी दाखल होत असल्याने विसर्ग सोडण्यात आले आहेत. त्यामुळे काल शुक्रवारी रात्री 9 वाजता नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत 10345 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. दारणा, गंगापूर आणि कडवा धरणांच्या पाणलोटात पावसाचा जसजसा पावसाचा जोर वाढत आहे. त्याप्रमाणात विसर्गही वाढविण्यात आहे. काल शुक्रवारी सायंकाळी गोदावरीतील विसर्ग 7190 क्युसेक होता. पाण्याची आवक वाढतच असल्याने नांदूरमधमेश्‍वर मधून रात्री 9 वाजता 3155 क्युसेकने विसर्ग वाढवून तो 10345 करण्यात आला होता.

गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान 15 ते 20 मिनीटे मुसळधार पाऊस झाला. तर काल दुपारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. काल उशीरापर्यंत पावसाचा जोर काहिसा कमी झाला असला तरी पावसात सलगता होती. यामुळे धरणांमध्ये नवीन पाणी दाखल झाले. धरणातील साठे तुडूंब असल्याने नवीन येणार्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल दारणा धरणातून 4316 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. बंद असलेला गंगापूर धरणाचा विसर्ग काल सायंकाळी 7 वाजता पुन्हा सोडण्यात आला. गंगापूर मधुनही 1136 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. कडवातून 212 क्युसेक, आळंदीतुन 30 क्युसेक असा विसर्ग करण्यात येत होता. धरणातील सोडण्यात येत असलेले पाणी आणि नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या पश्‍चिमेचे पावसाचे पाणी यामुळे नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने काल 7190 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. यामुळे गोदावरीचे पात्र पुन्हा दुथडी भरुन वाहु लागले आहे. काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासुन नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 10 टीएमसी पाण्याचा एकूण विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचे सातत्य राहिल्यास अजुनही पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे होऊ शकतो.

गोदावरीच्या लाभक्षेत्रात पाऊस

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरु आहे. मुसळधार पावसाची तीव्र गरज आहे. बहुतांशी भागातील सोयाबीन जळुन गेल्या आहेत. आणि उशीरा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे थोडी खुशी थोडा गम। अशी अवस्था शेतकर्‍यांची आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- पाऊस मिमी मध्ये- सोनेवाडी 46, कोपरगाव 85, पढेगाव 50, शिर्डी 40, राहाता 35, रांजणगाव 29, चितळी 60 असा पाऊस आहे. राहाता तालुक्यात काही ठिकाणी मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com