अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

साप्ताहिक सुट्ट्यांमुळे भाविकांचा ओघ वाढला
अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्ट्या व त्याला जोडून येत असलेल्या इतर सुट्या तसेच लग्न कार्य यामुळे अहमदनगर - पुणे महामार्गावर रविवारी विक्रमी गर्दी झाली.संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या .

अहमदनगर पुणे महामार्गावर आठवड्यातील चार दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवार या चार दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबे फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. तर मागील महिन्यात सुपा परिसरातील अनेक गावच्या यात्रा व आता मे महिन्यात लग्न तिथी मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असून यात अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. रुग्ण, लहान मुले यांचा या वाहतूक कोंडीमुळे कोंडमारा होत आहे .

अहमदनगर पुणे महामार्ग हा मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विदर्भाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. तसेच अहमदनगर व सुपा औद्योगिक वसाहतील ऑटोमोबाईल साहित्य, शेतीचा भाजीपाला, दूध, बंद पाणी, कांदा, बटाटा याची मोठ्या प्रमाणात वाहतूक अहमदनगर येथून पुणे, मुंबई सह कोकण पश्चिम महाराष्ट्रात रोज होत असते.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अहमदनगर ते शिरुर हा रस्ता रुंदीकरण होऊन दुपदरी झाला होता. परंतु पंधरा वर्षांच्या तुलनेने दहा पट वाहतूक वाढली असून सुप्याजवळ अजून एका अंतरराष्ट्रीय औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली असल्याने तेथे येणारा कच्चा माल कामगार वाहतूक बस व इतर वाहतूक यामुळे या महामार्गावर वाहनाची संख्या मोठ्या पटीत वाढली आहे. त्यामुळे आहे तो महामार्ग आज रोजी खुप कमी पडत असून सुपा परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. महामार्ग खुपच तोकडा झाला असून मागील एक वर्षात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. हा महामार्ग रुंद करावा व सुपा बस स्थानक चौकाचे रुंदीकरण करून येथे सिग्नल व्यवस्था करावा, अशी सुपा परिसरातील अनेक नागरिकांची मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com