
अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे
राज्यातील हजारो तरुण जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या भरती प्रक्रिरेवर राज्यातील राजकीय अस्थिरतेचे सावट आहे. जिल्हा परिषद भरतीचे जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 7 मे दरम्यान जाहीर प्रसिद्ध होणार होती.
आता मे महिन्यांचा पहिला आठवडा संपत आलेला असताना देखील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. मात्र, भरती प्रक्रिया राबवणार्या कंपनीला तांत्रिक अडचण आल्याने या महिन्यांच्या अखेरीस भरतीच्या ताराखा जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून 4 मे 2020 च्या शासन निर्णयाने राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र, करोना संकट कमी झाल्याने सर्व सुरळीत होत असतांना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, 15 ऑगस्ट 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत.
ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने निरुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
पदभरतीसाठी आरबीपीएस कंपनीबरोबर करार देखील झालेला आहे. यानंतर, जिल्हा परिषदेची भरती 1 ते 7 मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे संकेत दिले होते. तसेच या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिने लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. याकरिता निरुक्त केलेल्रा तज्ज्ञ समितीची नुकतीच बैठक होऊन यात परिक्षा, त्याचा अभ्यासक्रम आदींवर चर्चा देखील झालेली आहे.
त्यामुळे भरतीचे वेळापत्रक प्रसिद्धीची इच्छुकांना प्रतिक्षा आहे. परंतु, 5 मे उजाडून देखील वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यातच 16 आमदारांच्या अपात्रतेची अंतिम सुनावणी ही 10 मे दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यानंतर, राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. या जर तरच्या चर्चेचा परिणाम भरतीवर होत असल्याचे बोलले जात आहे. यातच वेळापत्रक देखील जाहीर होत नसल्याने घालमेल वाढली आहे.
दरम्यान, याबाबत हा विषय हाताळणार्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधला असता, राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांचा बिंदूनामावली तपासून पूर्ण झाला आहे. अंतिम झालेली रिक्त पदांची माहिती पुन्हा मंत्रालयात ग्रामविकास विभागाला कळवण्यात येणार आहेत. सध्या भरती कराव्याच्या अभ्यासक्रम आणि उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता याबाबत चर्चा सुरु आहे. भरतीसाठी करार झालेली कंपनी नवीन असल्यामुळे त्यांना भरती करावयाची पदे आणि त्यासाठी पात्र असणार्या उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता अंतिम करून 15 दिवसांत भरतीसाठी नवीन सॉफ्टवेअर विकसीत करण्यात येणार आहे. यामुळे या महिन्यांच्या अखेरीपर्यंत भरतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यात 946 पदे
नगर जिल्हा परिषदेत भरतीसाठी 946 पदे रिक्त असून या पदांची बिंदूनामावली तपासून पर्ण करण्यात आलेली आहे. यात सर्वाधिक पदे ही आरोग्य विभागाची आहेत. रिक्त असणार्या पदांचा तपशील राज्य सरकारला कळवण्यात आला असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत एकाच वेळी भरती करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असून सध्या ग्रामविकास विभागाच्या भरतीबाबतच्या सुचनांची वाट पाहत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.