<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेचा लाचखोर आरोग्य अधिकारी पैठणकर याच्याकडे काल दिवसभरात सुमारे 55 लाख रुपयांच्या मालमत्ता असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे आणखी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.</strong></p>.<p>ठेकेदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना घनकचरा व्यवस्थापन प्रमुख असलेल्या नरसिंह पैठणकर याला काल बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सावेडीत रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी पोलिसांनी केली. या चौकशीत त्याच्याकडे बुर्हाणनगरला दोन प्लॉट, निर्मलनगरला बंगला, प्लॉट आणि तीन लाखाची एफडी, नऊ तोळे सोने असल्याचे समोर आले. निर्मलनगरमध्ये तो राहत असलेल्या बंगल्यामागेच असलेला प्लॉट शाळेसाठी देण्यात आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. काल दिवसभरातील पोलीस चौकशीत पैठणकर याच्याकडे सुमारे 55 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.</p><p>आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार असून आणखी मालमत्तांची चौकशी करून शोध घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.</p>