जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना करोना संसर्ग
सार्वमत

जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना करोना संसर्ग

एका उपनिरीक्षकासह मुख्यालयातील 12 जणांचा समावेश

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

एका उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना करोनाने बाधित केले आहे. एका सहायक फौजदाराचा करोनाने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच बाधित होणार्‍यांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या 14 जणांमध्ये जिल्हा मुख्यालयातील 12 जणांचा समावेश आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयातील 12 कर्मचारी, शहर पोलीस दलातील एक उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार असे करोना बाधित झाले आहेत. या सर्वांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी निदान झाले. 12 पोलीस कर्मचारी शीघ्र कृती दलामध्ये कार्यरत आहेत. उपनिरीक्षक व पोलीस हवालदार शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये शीघ्र कृती दलाचे पोलीस बंदोबस्ताला उभे असतात.

शहर पोलीस दलात करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. बंदोबस्ताला उभे राहायचे की, पोलीस कर्मचार्‍यांना झालेल्या करोना संसर्गावर उपचाराचे नियोजन करायचे, अशा द्विधा मनस्थिती वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील 20 जणांना करोना संक्रमण झाल्याचे सिद्ध झाले आहे. एका सहायक फौजदाराचा करोनामुळे बळी गेला आहे.

शहर पोलीस दलातील उपनिरीक्षक, हवालदाराचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना क्कारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांचे बळ निम्मे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी करोना संसर्गावर उपचार घेत असताना सहायक फौजदाराचा मृत्यूही झाला.

त्यातच सोमवारी पुन्हा पोलीस मुख्यालयातील 12 कर्मचारी, शहरातील एका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि हवालदार यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त धडकले आहे. शहर पोलीस दलात करोनाच्याा वाढत्या प्रादुर्भावामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी धास्तावले.

शहर पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी करोनाचा संसर्ग झाल्यावर घाबरून जाऊ नये. पोलीस मुख्यालयातील मंगल कार्यालयामध्ये विलगीकरण कक्ष उभारला असून संपर्कात आलेल्यांवर तत्काळ उपचार होतील. संसर्ग झालेल्यांनाही चांगले उपचार मिळतील, अशी ग्वाही एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. तसे आरोग्य विभागाशी संपर्क साधून नियोजनही करण्यात आले असल्याचे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com