अहमदनगर (प्रतिनिधी) -

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या पाच वर्षापासून पसार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद

केला. अविनाश रामू बीडकर (वय 30 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बीडकर विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लालटाकी परिसरात सापळा लावून बीडकर याला अटक केली. 23 नोव्हेंबर 2017 रोजी अविनाश बाळासाहेब शिरसाठ (रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) यांना तिघांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व शिरसाठ यांची दुचाकी लुटली होती. शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली आहे.

बीडकर हा लालटाकी परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार नाणेकर, पोलीस कर्मचारी संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, सागर ससाणे यांच्या पथकाला आरोपी जेरबंद करण्याच्या सूचना केल्या. पथकाने लालटाकी परिसरात बीडकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपासकामी बीडकर याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.