अहमदनगर ( प्रतिनिधी) -

जिल्ह्याच्या काही भागात विशेषत:, श्रीरामपूर, कोपरगाव याठिकाणी करोना रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत

आहे. याशिवाय, ज्याठिकाणी सध्या रुग्णवाढीचा वेग कमी दिसत असला तरी आगामी काळात तो वाढणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. रुग्णवाढीचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या करून बाधित व्यक्तींना तात्काळ उपचार उपलब्ध करून देणे, त्यांना इतरांपासून अलग करणे आणि संसर्गाची साखळी तुटेल यापद्धतीने आता कार्यवाही आवश्यक आहे. महिना अखेरीस होणारी संभाव्य रुग्णसंख्या विचारात घेऊन नियोजन करावे, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केल्या.

बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त गमे आणि राज्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे उपस्थिती होती. आयुक्त गमे यांनी जिल्ह्यात दैनंदिनरित्या होणारे चाचण्यांचे प्रमाण, बाधितांचे प्रमाण, बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करणे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), प्रतिबंधीत क्षेत्रात (कन्टेन्टमेंट झोन) केल्या जाणार्या उपाययोजना, जिल्ह्यात असणारी मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता, औषधसाठा, जिल्ह्यात सध्या असणारी बेडसची उपलब्धता, ऑक्सीजन बेडस आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता आदींची माहिती घेतली.

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने करोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय, करोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी केल्या. यावेळी डॉ. सुधाकर शिंदे यांनीही चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासगी लॅबशी समन्वय साधून आणि करार करून त्यांच्या सेवा घ्या. करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनीही त्यांना काही लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करुन घेणे. आजार अंगावर न काढणे आणि कुटुंबातील इतर सदस्य बाधित होणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्ह्यातील सीसीसी सेंटर, तेथील बेडस उपलब्धता आणि संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सध्या ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे ते म्हणाले. बेडस उपलब्धता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या आदींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून समन्वय साधून काम वेगाने करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. आढावा बैठकीनंतर विभागीय आयुक्त गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले, आयुक्त शंकर गोरे यांनी महानगरपालिकेच्या नटराज हॉटेल येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर बालिकाश्रम रोड येथील महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या भागाला भेट दिली. तेथील नागरिकांशी थेट संवाद साधून माहिती घेतली.