अहमदनगर (प्रतिनिधी) - पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच असून नगर शहरात आज पॉवर पेट्रोल शंभरीच्या दरात पोहचले आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीची घोडदौड सुरूच आहे. नगर शहरात पेट्रोल-डिझेलच्या भावाने आज उच्चांक गाठला.

आज सोमवारी देशभरात पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 32 पैशांनी महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर नगरात आज एक लिटर पॉवर पेट्रोलचा भाव 98.59 तर साध्या पेट्रोलचा भाव 95.16 इतका असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

साध्या पेट्रोलचे दर 95 रुपयांच्या पुढे सरकले असून आठवडाभरात सरासरी दोन रुपयांनी पेट्रोल महागले आहे. नगर शहरात गत सोमवारी (दि.8) 93.20 भाव असलेले पेट्रोल आज 95.16 रुपयांवर पोहचले आहे.

डिझेलच्या भावातही अडीच रुपयांनी वाढ झाली आहे. गत सोमवारी 82.45 रुपये दर असलेले डिझेल 84.75 रुपयांवर पोहचले आहे.

देशभरात इंधनाच्या दरांमध्ये काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेले अधिभार तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात होणार्या बदलांमुळे इंधनाची दरवाढ होत आहे, त्याची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे.

गॅस 50 रुपयांनी महागला

घरगुती सिलेंडरच्या दरातही 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडरसाठी नगरकरांना आता जवळपास 782 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 14.2 किलो सिलेंडर गॅसची किंमत 719 रुपये इतकी होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. ऐकीकडे सिलेंडरचे दर सतत वाढत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022 साठी पेट्रोलियम सब्सिडी हटवून 12 हजार 995 करोड रूपये केले आहेत. दरम्यान केंद्र सरकार लवकरच सिलेंडरवरील सब्सिडी रद्द करेल असा अंदाज वर्तविण्यात आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या विक्रीवर सरकारकडून अनुदान मिळते. अनुदानात मिळणारी ही रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.