
अहमदनगर | Ahmednagar
शिक्षकाचे आणि विद्यार्थी यांचं नातं हे घट्ट असते. विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षकांसोबत जातो त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना एक जिव्हाळा निर्माण होतो. मात्र, जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षकाची बदली होती. तेव्हा विद्यार्थ्यांचे हृदय भरून येते. असाच काहीसा प्रकार पाथर्डी तालुक्यामधील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेमध्ये घडला. आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थीचं नव्हेतर गावकऱ्यांनाही अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.
या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ट्वीट केला आहे. लळा असा लावावा की शिक्षकाच्या निरोपावेळी फक्त शाळेतील विद्यार्थीच नाही, तर गावातील गावकऱ्यांनाही गहिवर दाटून यावा! अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या निरोप समारंभाचे हे दृश्य हेलावून टाकणारे आहे. असा सुंदर कॅप्शन देत शेअर केलेला हा व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधत आहे.
या व्हिडिओत फक्त विद्यार्थीच नाही तर संपूर्ण गाव या शिक्षकांसाठी रडत असल्याचं दिसत आहे. विद्यार्थी व गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत या शिक्षकांना निरोप दिला. विद्यार्थी आणि गावकरी तर चक्क शिक्षकांना बिलगून रडत असल्याचं दिसत. त्यांच्या विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे प्रेम पाहून शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकजणांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रेम, विश्वास मिळवलेला गुरू, लाखात एक असा शिक्षक अशा अनेक प्रकारच्या कमेंटही या व्हिडीओवर आल्या आहेत.