अहमदनगर (प्रतिनिधी) - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाने फतवा काढत दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे. हा रिपोर्ट नसल्यास दुकाने सील करण्यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

भिंगारमध्येही कोरोनाने डोके वर काढले असून फैलाव जोमाने सुरू झाला आहे. दुकानदार, भाजी आणि फळ विक्रेत्यांसह नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याची पायमल्ली केली जात आहे. त्यावर कॅन्टोमेंट बोर्डाने आता नामी उपाय शोधला आहे. 31 मार्च 2021 नंतर कोरोना चाचणी प्रमाणपत्र अर्थात निगेटिव्ह रिपोर्ट दुकानदार, विक्रेत्यांकडे असणे अनिर्वाय आहे. हा रिपोर्ट नसल्यास संबंधित दुकानदारांकडून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला जाणार असून दुकान सील केले जाणार आहे. तसे आदेशच कॅन्टोमेंट बोर्डाची सीईओ विद्याधर पवार यांनी काढले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे निवेदन सीईओ पवार यांनी काढले आहे.

बाजार बंद, चाचणीचीही सोय

भिंगारचा शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. कोरोना चाचणीसाठी कॅन्टोमेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली आहे. भाजीपाला, फळ विक्रेते आणि दुकानदारांनी या हॉस्पिटलमध्ये जावून कोरोना चाचणी करावी असे आवाहन सीईओ पवार यांनी केले आहे.