अहमदनगर : धरणांच्या पाणलोटात पावसाची दडी, लाभक्षेत्रातही चिंता

अहमदनगर : धरणांच्या पाणलोटात पावसाची दडी, लाभक्षेत्रातही चिंता

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असताना, दुसरीकडे नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात तसेच नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अन्य जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पाणलोटात पाऊस न झाल्यास मोठे संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा-निळवंडे, मुळा आणि दारणा, गंगापूर तसेच दक्षिण नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. भंडारदरा आणि मुळा धरणात गतवर्षीचा साठा मुबलक होता. त्यामुळे अजूनही या धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा आहे. पण दारणा, गंगापूरमध्ये कमी पाणीसाठा आहे. तसेच कुकडीतील पाचही धरणात आज मितीस केवळ 17.82 टक्के पाणीसाठा आहे.

नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पण पाणलोटात अद्यापही पावसाने जोर न धरल्याने भाताची आवणी लांबणीवर पडली आहे. भंडारदरा आणि कोतूळ वार्ताहराने कळविले की, मंगळवारी या धरणाच्या पाणलोटात अधूनमधून रिपरिप सुरू होती. त्यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे.

धरणातील पाणीसाठ्यावरच रब्बीची पेरणी अवलंबून असते. पण अद्यापही धरण पाणलोटात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात अत्यल्प नव्याने पाण्याची आवक झाली. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात 4701 दलघफू तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात9361 दलघफू पाणीसाठा आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत केवळ 1016 दलघफू पाणीसाठा आहे. आढळात 459 दलघफू पाणीसाठा आहे. गतवर्षी पाणलोटात मुबलक पाऊस झाल्याने ही धरणं तुंडूब झाली होती. त्यामुळे यंदा या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक होता. पण यंदा अजूनही जोरदार पाऊस न बरसल्याने फारसे नवीन पाणी आलेले नाही. जर गतवर्षीचा साठा नसतातर आता मोठे संकट नगरकरांवरआले असते.

गंगापूर धरणात 33 तरदारणात 45 टक्के पाणीसाठा आहे. धरण पाणलोटातही पाऊस नसल्याने गोदावरीत यंदा फारसे पाणी नाही. घोड धरणात 25 टक्के पाणीसाठा आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पाची बिकट अवस्था आहे. येडगाव धरणात आजमितीस 45.53 टक्के पाणीसाठा आहे. माणिकडोहध्ये केवळ 10.53 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.वडजध्ये 36.09 पाणीसाठा आहे. पिंपळगाव जोगात तर उणे 59.41 टक्के पाणी आहे. डिंभे सर्वात मोठे धरण. त्यातही केवळ 23 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात एकूण 17.82 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com