मनपा कराची थकबाकी असणार्‍यांवर जप्तीची कारवाई

आयुक्त जावळे यांचा इशारा; वसुली विभागाची बैठक
मनपा कराची थकबाकी असणार्‍यांवर जप्तीची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)

महानगरपालिकेची कराची थकबाकी सुमारे 250 कोटी रूपये असून मागील वर्षी तीन वेळा शास्ती माफीची सवलत देऊनही अवघी 12 कोटी रूपयांची वसुली झाली आहे. आता यावर्षी कुठलेही शास्ती माफी नाही. उपायुक्त यांनी प्रभागानुसार बैठक घेऊन मनपा कराची थकबाकी असणार्‍या नागरिकांवर जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या आहेत.

महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाच्या बैठकीत आयुक्त डॉ. जावळे यांनी वरील सूचना दिल्या आहेत. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, कर वसुली विभागप्रमुख प्रमुख विनायक जोशी व वसुली कर्मचारी उपस्थित होते. उपायुक्त यांनी प्रभागानुसार बैठक घेऊन मनपा कराची थकबाकी असणार्‍या नागरिकांवर जप्तीची कारवाई करावी, त्याचे वेळापत्रक तयार करा 30 टक्केच्या खाली वसुली असणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीस द्या व एक लाख रूपयाच्या पुढील थकबाकी असणार्‍या नागरिकांची यादी तयार करा व त्यांना नोटीसा द्या, याचबरोबर शहरातील ओपन प्लॉट धारकांची थकबाकी असणार्‍यांच्या सातबारा उतारा व सिटीसर्वेला बोजा लावण्याचे काम करा. न्यायप्रविष्ट असणार्‍या प्रकरणाबाबत वकिलांशी तातडीने चर्चा करावी व त्यानुसार पुढील कारवाई करावी, असेही आयुक्त डॉ. जावळे यांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान, दरवर्षी कर भरणारे काही नागरिक आपला कर प्रामाणिकपणे भरत असतात मात्र थकबाकी असणारे नागरिक कर भरत नाही. यावर्षी थकबाकी असणार्‍या नागरिकांची कर वसुली मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. अन्यथा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्त डॉ. जावळे यांनी दिला. उपायुक्त सचिन बांगर यांनी प्रत्येक वसुली कर्मचार्‍यांच्या कामाची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com