अहमदनगर | Ahmednagar
जून महिना नुकतंच सुरू झालाय. जून उजाडला तसं मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
नगर जिल्ह्यातील शिर्डी, राहाता परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे. अचानकच्या वादळी वाऱ्यामुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज
दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्यांचा प्रचंड वेग असल्यामुळे वाहन चालवणं तसंच रस्त्यावर थांबणं सुद्धा कठीण झाल होतं. या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरासमोरील दृश्य दिसेनासे झाले होते. या वादळीवादामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आज रविवार (दि.०४) रोजी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागांत वातावरणात बदल होत संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून ऊन सावलीचा खेळ सुरु होता. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पाऊस कोसळणार असे चित्र निर्माण झाले होते.
दरम्यान, मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) लवकरच देशात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, केरळच्या किनारपट्टीपासून मान्सून अवघ्या ४०० किलोमीटर अंतरावर आहे. मान्सूनसंबंधी भारताच्या हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कौमोरिन परिसरात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे, दक्षिण बंगालचा उपसागर आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.