देशव्यापी संपाचे नगरमध्ये पडसाद

देशव्यापी संपाचे नगरमध्ये पडसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)

कामगार विरोधी कायदे, खासगीकरण यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात नगरमधील विविध कार्यालयांचे कर्मचारी सहभागी झाले. कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारून निदर्शने केली. त्यात टपाल, बँक, वीज कर्मचाऱ्यांबरोबरच विडी कामगारांचाही समावेश होता.

टपाल सेवा ठप्प

नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, डाक विभागाच्या खाजगीकरणांच्या हालचाली थांबवा, यासह सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना सहभागी झाल्यामुळे अहमदनगर विभागातील टपाल सेवा ठप्प झाल्याचा दावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष यादव यांनी केला आहे.

प्रधान डाकघराच्या समोर आयोजित द्वारदसभेत ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, कामगार कायद्यात सकारात्मक बदल करा टपाल विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्याची छळवणूक थांबवा, 'कोरोनाकाळात सेवा देत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्या व त्याच्या वारसास अनुकंपावर सेवेत सामावून घ्या. सभेस संघटनेचे विभागीय सचिव कमलेश मिरगणे, प्रमोद कदम, सुनिल थोरात, आनंदराव पवार, अमित कोरडे, सलीम शेख, संजय परभणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नामदेव डेंगळे, संदीप कोकाटे, अनिल धनावत, भाऊ श्रीमंदिलकर, प्रदीप सूर्यवंशी, राधाकिसन मोटे, सागर पंचारिया, तान्हाजी सूर्यवंशी, नितीन थोरवे, अभिमन्युकुमार, श्रीमती आश्विनी चिंतामणी, श्रीमती मोनाली हिंगे, श्रीमती निलिमा कुलकर्णी, श्रीमती अर्चना भुजबळ, शुभांगी शेळके, श्रीमती नाजमीन शेख, सविता ताकपेरे, शुभांगी मांडगे, सुनील भागवत, किशोर नेमाने, अंबादास सुद्रीक, स्वप्नील पवार, बाबासाहेब बुट्टे, संपत घुले, बाबासाहेब बोरुडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. द्वारसभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे विभागीय सचिव कमलेश मिरगणे तर आभार संदीप कोकाटे यांनी मानले.

प्रमुख मागण्या

जुनी पेन्शन योजना सर्वांकरिता लागू करा.

खाजगीकरणाचे धोरण थांबवा.

कामगार संघटनेवरील हल्ले थांबवा.

रिक्त जागा भरा.

थकीत महागाई भत्ता त्वरित द्या.

करोनामृत कर्मचाऱ्यांच्या वारसास दहा लाखाचे आर्थिक मदत द्या व अनुकंपावर सेवेत सामावून घ्या.

ग्रामीण सेवकांना कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करा.

बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात नगरमधील बँक कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होत चितळे रोड येथील युको बँकेसमोर निदर्शने केली. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस कॉ. कांतीलाल वर्मा, कॉ.सायली शिंदे, उल्हास देसाई, माणिक आडाणे, उमाकांत कुलकर्णी, कॉ. खामकर, मोईन शेख, प्रविण मेहेत्रे, अमोल बर्वे, प्रकाश कोटा, विजेंद्र सिंग, अजित बर्डे, गोरख चौधरी, सचिन बोठे, किर्ती जोशी, संदिप शिरोदे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी कॉ. कांतीलाल वर्मा म्हणाले, बँकांचे खाजगीकरण करू नये, बँकात नोकर भरती करावी, बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना कायदेशीर अधिकार द्यावेत. या संपातील मागण्या बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हिताच्या नसून जनहिताच्या आहेत, त्यामुळे जनतेने या संपाला पाठिंबा देऊन सरकारच्या या धोरणांच्या विरोधात उभे राहावे. सरकारने तयार केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, कामगारविरोधी धोरण थांबवावे, सन २००४ पासून लागू केलेली पेन्शन योजना रद्द करावी व जुनी पेन्शन परत सुरु करावी, या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून निवेदने, संप करण्यात येत आहे, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. ही गंभीर बाब असून, या धोरणांचा कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना त्रासदायक असल्याने ते तातडीने रह करुन कर्मचाऱ्यांच्या मागण्यापूर्ण करव्यात, अन्यथा पेक्षाही मोठे आंदोलन केले जाईल, असे कॉ. वर्मा यांनी सांगितले. निदर्शनानंतर जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून मागण्यांचे निवेदन दिले. या दोन दिवसीय संपात अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. ग्राहकांना होणार्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

विडी कामगारांचे धरणे

देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अहमदनगर जिल्हा आयटक व लालबावटा विडी कामगार युनियन संयुक्त कृती समितीच्यावतीने पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने कामगारांचे ४४ कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या ४ कोड बील रद्द करावे व खासगीकरण थांबविण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी कामगारांनी यावेळी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. या आंदोलनात आयटकचे जिल्हा सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, महाराष्ट्र राज्य विडी फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, ॲड. कॉ. सुभाष लांडे, अवतार मेहरबाबा ट्रस्ट कामगार युनिटचे अध्यक्ष कॉ. सतीश पवार, मोलकरीण संघटनाचे कमलेश सपरा, प्रदीप नारंग, भुजबळ, आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा थोरात, महापालिका आशा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा भणगे, इंटकचे शंकरराव मंगलारम, विनायक मच्चा, कविता मच्चा, विजय भोसले, महादेव पालवे, संतोष बत्तीन आदी सहभागी झाले होते.

देशातील सर्व प्रमुख केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने कामगार कायदे मोडीत काढून ४४ कायद्याचे रुपांतर चार कोडमध्ये केले आहे. या कामगार कायदे बदलाच्या नावाखाली भांडवलदार व मालकांच्या हिताचे कायदे करण्यात आले आहे. कामगार संघटना मोडीत काढण्याचे केंद्र सरकारचा डाव असून, कायम शब्दच रद्द करून कंत्राटीकरण आणण्याचा डाव सरकार करत आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. या आंदोलनात लालबावटा विडी कामगार युनियन, आयटक कामगार संघटना, इंटक विडी कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा जनरल कामगार युनियन, घरेलू मोलकरीण व घरगडी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

वीज संघटना आक्रमक

देशव्यापी संपात महावितरणच्या २६ वीज कामगार संघटना सहभागी झाल्या. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली. या वेळी परिसर घोषणांनी दुमदुमला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com