
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
उर्ध्व गोदावरी खोर्यातील धरण समुहातील समन्यायी पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी काल जलसंपदाच्या प्रशासकिय पातळीवरील बैठक छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या दालनात काल संपन्न झाली.
या बैठकीला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे प्रभारी कार्यकारी संचालक विजय घोगरे, जायकवाडी प्रकल्पाचे अधिकारी, नाशिक जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, मुख्यअभियंता प्रकाश मिसाळ, नाशिक च्या जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, मुळा च्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, नगरचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत नगर, नाशिक या जिल्ह्यांतील धरणांचे व जायकवाडी धरणांचा 15 ऑक्टोबरचा उपयुक्तसाठा, खरीप हंगामातील पाणी वापर बाष्पीभवनासह, समन्यायी पाणी वाटपासाठी हिशोबात घ्यावयाचे पाणी, यावर बैठकीत चर्चा झाली. उपलब्ध पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात येणार आहे. त्यावर तपासणी करुन मेंढेगिरी अहवाला प्रमाणे कोणता पर्याय उचित होईल यावर अभ्यास करुन निर्णय होईल.
कालच्या बैठकीत कधी व किती पाणी सोडायचे याचा निर्णय झाला नाही. मात्र सर्व माहिती संकलित करुन त्यावर पुढे निर्णय होईल. या माहिती वर पृथ्थकरण करुन त्यानंतर निर्णय होईल. तो अहवाल जलसंपदा मंत्रालयाकडे सोपविला जाईल. तेथे मंत्रलयीन पातळीवर पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो. समन्यायी पाणी वाटप कायदा केलेला असल्याने पाणी सोडावेच लागणार आहे. नेमके किती पाणी सोडायचे याचा निर्णय पुढे होईल.
दरम्यान नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी साठा आहे. परंतु लाभक्षेत्रात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाची विषमता पाहाता, त्यामुळे पाणी सोडण्याला मर्यादा हवी! असे सर्व सामान्य शेतकर्यांना वाटते. जलसंपदा मंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे नगर, नाशिक च्या लोकप्रतिनिधींनी या दोन्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहाता कमी प्रमाणात पाणी सोडण्याचा आग्रह धरावा, व वस्तुस्थिती मांडावी, अशी शेतकर्यांची भावना आहे. खरीप हातचा गेला, तर रब्बीच्या आशा धुसर झाली आहे. चारा पिके अडचणीत येवु शकतात. यामुळे मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.