नामांतराचा प्रस्ताव महापालिकेकडून तयार

महासभेच्या निर्णयानंतर हरकती मागविण्यात येणार
नामांतराचा प्रस्ताव महापालिकेकडून तयार

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

स्थानिक नगरसेवक अथवा जिल्ह्यातील एकाही आमदारांकडून जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबत महापालिकेकडे अधिकृत मागणी नसताना केवळ शासनाच्या सूचनेवरून नामांतराचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.

सदर प्रस्ताव महासभेकडे पाठविण्यात येणार असून, महासभेच्या निर्णयानंतर हरकती मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, एकाही नगरसेवकाची अथवा आमदारांची मागणी नसतानाही, तसेच जिल्ह्याच्या नामांतराबाबत महापालिकेला अधिकार नसताना, कायद्यात तरतूद नसतानाही मनपाने प्रस्ताव केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी नगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामकरण करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार मनपाच्या बांधकाम विभागामार्फत नामांतराबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या नामांतराबाबत मनपा अधिनियमामध्ये कोणतीही तरतूद उपलब्ध नाही, तसेच जिल्ह्याचे नाव बदलणे ही बाब महापालिकेच्या अखत्यारीतही नाही, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, मनपाच्या बहुमताच्या ठरावाने मागणी करण्यात आल्याने हा प्रस्ताव करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव महासभेकडे पाठविण्यात येणार असून, या प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती मागविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात इतर माहिती शासनाला पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडील मार्गदर्शक तत्वानुसार निकषांची पूर्तता करून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव मराठी व इंग्रजी भाषेत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबत महापालिकेच्या बहुमताच्या ठरावाची प्रत, अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन व मुख्य पोस्ट ऑफीस यांचे ना हरकत प्रमाणपत्र, शहराची महानगरपालिका, नगरपालिका कधी अस्तित्वात आली याबाबतची माहिती व अधिसूचनेची प्रत, अहमदनगर हे शहर महसुली शहर कधी अस्तित्वात आले, याबाबतची माहिती व अधिसूचनेची प्रत सादर करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com