
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी नसलेले व जनतेने नाकारल्यानंतर मागच्या दाराने आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांना नगरच्या नामांतराचा विषय काढण्यास कोणताही नैतिक अधिकार नाही. स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी यांची नामांतराची अधिकृत मागणी नसताना देखील समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम शहराच्या नामांतराचा विषय घेऊन भाजप करीत असल्याचा आरोप साहेबान जहागीरदार यांनी केला आहे. तर सर्वसामान्य स्थानिक जनतेचा नामांतराला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील बेरोजगारी, महागाई, शेतकर्यांच्या आत्महत्या आदी विविध ज्वलंत प्रश्न असताना, या प्रश्नांना बगल देऊन समाजात फक्त शहराच्या नावावरून धर्मांधतेला खतपाणी घातले जात आहे. ज्यांना जनतेने देखील स्विकारले नाही, निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकर यांनी दुसर्यांच्या शहरात नाक खुपसून घाणेरडे राजकारण चालवले असल्याचा टोला जहागीरदार यांनी लगावला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची याबाबत कोणतीही मागणी नसताना मागच्या दाराने विधान परिषदेत आमदार झालेल्या पडळकर यांच्या नामांतर विषयाची दखल घेण्याची गरज नव्हती.
मात्र, शासनाच्या सूचनेवरून नामांतराचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना महापालिकेच्या महासभेने देखील या प्रस्तावाला मंजुरी देऊ नये. शहराच्या नामांतराने कोणता मोठा बदल होणार नाही. नगर शहराला साडेपाचशे वर्षाचा मोठा इतिहास आहे. राज्यातील हे एकमेव असे शहर आहे, की ज्याला स्थापना दिन आहे. अहमद निजामशहा बादशहाने हे शहर वसविले आहे. फक्त मुस्लिम नाव असल्याने नामांतराचा घाट घालून भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.