अहमदनगरचे नामांतर होणार ?

पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची आ. गोपीचंद पडळकर यांची मागणी
अहमदनगरचे नामांतर होणार ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होते का? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे असून इतिहासातील पानांवर हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान होत्या जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे.

त्यांची कर्मभूमी अखंड हिंदूस्थान आहे. परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये तर या हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे. त्याकरिता अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com