महापालिकेने पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करावी

सैनिक समाज पार्टीची मनपा प्रशासनाकडे मागणी
महापालिकेने पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे व प्रदेश सचिव अरुण खीची यांनी शहर सुधार समितीचे भैरवनाथ वाकळे, संजय झिंजे यांच्याकडे सदर पत्र सुपुर्द करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या जनप्रबोधन फेरीत सहभागी झाले. करोना साथीच्या रोगाची परिस्थिती असताना महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ अन्वये शहरातील नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची गरज आहे.

मागील दोन वर्षापासून करोनाच्या महामारीने नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. करोनाच्या टाळेबंदीत अनेकांनी नोकर्‍या गमावल्या, हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने कर वसुल करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com