थंड प्रतिसादाने मनपा चिंतेत

68 लाखांवर पाणी सोडल्यानंतरही अवघे दोन कोटी वसूल
थंड प्रतिसादाने मनपा चिंतेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपाने हक्काच्या 68 लाखावर पाणी सोडले, तेव्हा मागील 10 दिवसात मनपाच्या तिजोरीत थकीत संकलित कराची एक कोटी 97 लाख म्हणजे जवळपास सुमारे दोन कोटीची रक्कम जमा झाली आहे. या महिनाखेरीपर्यंत शास्ती माफीची योजना मनपाद्वारे राबवली जात आहे. पण सुरूवातीच्या 10 दिवसातच तिला कमी प्रतिसाद मिळाल्याने आता शहरभर या योजनेची फ्लेक्सद्वारे जनजागृती करण्यासह मनपाचे सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकार्‍यांना पत्र देऊन त्यांनी त्यांच्या भागात या योजनेची जनजागृती करावी व जास्तीतजास्त थकबाकीदारांना मनपाचे पैसे भरण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन केले गेले आहे.

महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी नगरला रूजू झाल्यानंतर सर्व विभागांचा आढावा घेतल्यावर मनपाच्या तिजोरीत असलेली आर्थिक चणचण व त्यामुळे विकास कामे राबवण्यात येत असलेल्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संकलित कराची थकबाकी वसूल होण्यासाठी 100 टक्के शास्तीमाफीचा धाडसी निर्णय घेतला. याआधीच्या आयुक्तांनी 25 ते 75 टक्क्यापर्यंत शास्तीमाफी दिली होती. मात्र, डॉ. जावळे यांनी पूर्ण 100 टक्के शास्ती माफी देण्याचे जाहीर केले.

मनपाची सुमारे 232 कोटींची थकबाकी असून, यात तब्बल 101 कोटींची शास्तीची (दंडाची) रक्कम आहे. ही रक्कम आतापर्यंत वसूलच झालेली नाही, त्यामुळे ती माफ करण्याचे दुःख नाही. किमान, मुद्दल रक्कम वसूल होईल, असा दावा करीत आयुक्त डॉ. जावळेंनी शास्तीमाफीचा निर्णय मागील 26 जुलैपासून लागू केला. त्यानंतर 4 ऑगस्टपर्यंतच्या दहा दिवसात मनपाच्या तिजोरीत संकलित कर थकबाकीचे 1 कोटी 97 लाख जमा झाले आहेत. मात्र, त्यासाठी 68 लाखाच्या शास्तीवर पाणी सोडावे लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com