
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीत यंदा महापालिकेने इतिहासातील सर्वोच्च वसुलीची नोंद केली आहे. पाच वर्षांपूर्वी सन 2018-19 मध्ये 69.29 कोटींच्या सर्वोच्च वसुलीची नोंद झाली होती. यंदा सन 2022-23 या आर्थिक वर्षात महापालिकेने विक्रमी 70.15 कोटींची कर वसुली केली आहे. यात 39.10 कोटींची थकबाकी तर 31.05 कोटी रूपयांची 2022-23 वर्षातील कराची वसुली झाली आहे. दरम्यान, थकबाकीच्या प्रमाणात वसुलीचे प्रमाण मात्र 28 टक्केच आहे.
मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीची 64.06 कोटींची वसुली झाली होती. त्यात यंदाच्या वर्षी सहा कोटींनी वाढ झाली आहे. सन 2022-23 मध्ये 198.39 कोटींची थकबाकी व 51.38 कोटींची चालू मागणी अशी एकूण 249.77 कोटींची मागणी होती. त्यापैकी वर्षभरात 39.10 कोटींची थकबाकी व 31.05 कोटी रूपयांचा चालू वर्षाचा कर जमा झाला आहे.
तर 159.29 कोटींचा जुना थकीत कर व 20.33 कोटींचा 2022-23 चा कर अशी एकूण 179.62 कोटींची थकबाकी कायम आहे. थकीत रकमेच्या वसुलीचे प्रमाण अवघे 19.71 टक्के आहे. तर यंदा 60.43 टक्के नियमित कर वसूल झाला आहे. एकूण थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण मात्र अवघे 28 टक्केच आहे.
प्रभागनिहाय कर वसुली
सावेडी (25.10 कोटी), शहर (13.39 कोटी), झेंडीगेट (10.41 कोटी), बुरूडगाव रोड (21.33 कोटी) अशी प्रभाग समितीनिहाय कर वसुली करण्यात आली आहे.