
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वीच विविध प्रकारच्या कर व दर वाढीचे प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केले आहेत. यात घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्ताव आहे. यासह इतर विषयांवर निर्णय घेण्यासाठी आज (बुधवारी) स्थायी समितीची तातडीची सभा बोलाविण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांची शिफारस व अधिनियमातील तरतुदीनुसार ही तातडीची सभा बोलाविण्यात आली आहे. दरम्यान, येत्या दोन महिन्यांत अमृत योजनेतील कामे पूर्ण होऊन संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात कर योग्य मूल्याच्या दोन टक्के अग्निशमन कर लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, गेल्या तीन वर्षांपासून याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव अजेंड्यावर घेण्यात आला आहे. तसेच रस्ता खोदाई शुल्कात वाढ करणे, शहरातील व्यावसायिक आस्थापनांना व्यवसाय परवाना शुल्क आकारणे, मांडव - मंडप भाडे शुल्कात वाढ करणे, रक्तपेढी विभागाकडील रक्त पिशव्यांचे दर निश्चित करणे, भिस्तबाग महाल परिसर सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास निधीतून प्राप्त सव्वा कोटीच्या निधीतून कामाची निविदा मंजूर करणे आदी विविध विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.