स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पामुळे वीज बिलात 70 टक्के बचत

उपायुक्त डांगे यांचे स्थायी समिती सभेत स्पष्टीकरण
स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पामुळे वीज बिलात 70 टक्के बचत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात स्मार्ट एलईडीप्रकल्पांतर्गत 35 हजार पथदिवे बसवले गेले आहेत व हे पथदिवे बसवण्याआधी मनपाला 70 ते 80 लाखाचे वीजबिल येत होते. पण, काही पथदिवे नादुरुस्त वा बंद असल्याने त्या काळात सरासरी 50 लाखापर्यंत वीज बिल येत होते. मात्र, शहरात स्मार्ट एलईडी प्रकल्पांतर्गत 35 हजारावर पथदिवे बसवल्यानंतर मनपाच्या वीज बिलात 65 ते 70 टक्के बचत झाली असून, आता मनपाला सुमारे 25 लाखापर्यंत पथदिव्यांचे वीज बिल येते, असे स्पष्टीकरण मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सोमवारी मनपा स्थायी समितीच्या सभेत दिले.

दरम्यान,पथदिव्याच्या ठेकेदाराने करारानुसार काम केले नसल्याने त्याला प्रतिदिन 1 लाखाच्या दंडाचा प्रस्ताव केला आहे. मात्र, आयुक्तांनी त्याला मान्यता दिलेली नाही. आधी प्रकल्प पूर्ण करून घ्या, असे त्यांनी सांगितले असल्याचेही उपायुक्त डांगे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले. मनपा स्थायी समितीची सभा सभापती कुमारसिंह वाकळे यांच्याअध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, गणेश कवडे, राहुल कांबळे तसेच नगरसेविका रुपाली वारे, गौरी नन्नवरे, ज्योती गाडे व मंगल लोखंडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे, सचिन बांगर, नगरसचिव एस. बी. तडवी आदीसह मनपाच्याविविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सभेत स्मार्ट एलईडी प्रकल्पाचा विषय नगरसेवक कवडे यांनी उपस्थित केला.

सभापती वाकळे यांनीही उपप्रश्नांसह या चर्चेत भाग घेतला. स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाने मनपाच्या वीज बिलात 80 टक्के बचत होईल व कर्मचारीही कमी लागतील, असा दावा केला गेला होता. मात्र, तसे झाले नसल्याचे ते म्हणाले. पण उपायुक्त डांगे यांनी तो खोडून काढला. संबंधित ठेकेदाराला करार पाळला नसल्याने रोज एक लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेनुसार 20 कोटीचा दंडाचा प्रस्ताव केला आहे. पण त्याला आयुक्तांची मान्यता नाही. संबंधित ठेकेदाराकडून आधी प्रकल्प पूर्ण करून घ्या, असे आयुक्तांचे म्हणणे आहे, असे सांगून उपायुक्त डांगे म्हणाले, या प्रकल्पामुळे 65 ते 70 टक्के वीजबिल बचत झाली आहे व सरासरी 50 ते 60 लाखाचे येणारे बिल आता 25 लाखावर आले आहे.

यावेळी सभापती वाकळे यांनी मनपा ब्लड बँकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना, मनपाची ही अत्यंत घाणेरडी व गचाळ सेवा असल्याचा आरोप केला. माझ्या वाढदिवसानिमित्त मनपा ब्लड बँकेच्या मदतीने रक्तदान शिबीर घेतले. पण या शिबिरासाठी मनपाने मंडप टाकला नाही, रक्तदात्यांना नाष्टा व साधा चहाही दिला नाही. या शिबिरासाठी आलेल्या डॉक्टरांपैकी अनेकांनी दाढी केलेली नव्हती, मावा-गुटखा खाऊन काहीजण आले होते, पायात बूट नव्हते व साध्या चपला होत्या, त्यांच्या पायाची नखेही त्यांनी कापलेली नव्हती, साधे अ‍ॅप्रनही त्यांनी घातलेले नव्हते, असा तक्रारींचा पाढा सभापती वाकळेंनी सुरू केल्यावर उपायुक्त डांगेंनी या चर्चेत भाग घेतला व रक्तदान शिबीर आयोजक चहा-पाणी व नाष्टा खर्च करतात.

तुम्ही तक्रारी करताना अतिशयोक्ती करता असे ते म्हणाले, त्यावर सभापती वाकळेंनी, माझ्यावाढदिवसाच्या रक्तदान शिबिरात हे सारे घडले आहे व ते सारे खरे आहे. तुम्ही असे म्हणताल, हे आधी समजले असते तर त्या घटनांचे फोटो व व्हीडीओ मी काढले असते. तुम्ही चुकीच्या कामावर पांघ़रूण घालत आहात, पण यामुळे मनपाची इमेज खराब होत आहे, असे सभापती वाकळेंनी सुनावले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com