
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर महापालिकेतील तांत्रिक पदांच्या सुमारे 175 रिक्त कर्मचार्यांच्या जागा सरळ सेवाभरती प्रक्रियेव्दारे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यातील वर्ग तीन व वर्ग चार मधील जागांची बिंदू नामवली आल्यामुळे या जागा भरण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेला 25 नवीन अभियंते, 7 डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेचा 2890 जागांचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. त्यातील प्रत्यक्ष 1600 जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांशी तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामात अडथळे येत आहेत. या रिक्त पदांपैकी 9 जागा प्रतिनियुक्तीने, तर 175 जागांवर सरळ सेवाभरती प्रक्रियेव्दारे कर्मचारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने नगर विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्याला मंजुरी मिळाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत ही प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्तावही मनपाने या संस्थेला सादर केलेला आहे. मात्र, संस्थेकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महापालिकेत आधीच तांत्रिक कर्मचारी, अभियंत्यांची वाणवा आहे. त्यात आता अभियंता सुरेश इथापे व रोहिदास सातपुते महिनाअखेरीस निवृत्त होणार आहेत. इथापे यांच्याकडे सध्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा कार्यभार आहे. तर सातपुते सध्या नगररचना विभागात कार्यरत आहेत. त्यांचा कार्यभार आता इतर अभियांत्याकडे सोपवावा लागणार आहे.
अभियंत्यांच्या या 25 जागा भरणार
शाखा अभियंता (स्थापत्य) 6, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 3, अभियांत्रिकी सहाय्यक 8, शाखा अभियंता (यांत्रिकी) 2, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 3, शाखा अभियंता (विद्युत) 2, कनिष्ठ अभियंता (टोमोबाईल) 1. मनपात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. सध्या तातडीची गरज म्हणून त्यापैकी 25 पदे भरण्यात येणार आहेत.