महापालिकेला मिळाले कोविशिल्डचे 7000 डोस

दुसर्‍या डोसलाच प्राधान्य । फोन, मेसेजद्वारे संदेश
महापालिकेला मिळाले कोविशिल्डचे 7000 डोस

अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रशासनाकडून महापालिकेला रात्री उशिराने 7 हजार कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले आहेत. हे सगळे डोस फक्त दुसरे डोस असणार्‍यांनाच दिले जाणार आहेत. महापालिकेतून लाभार्थ्यांना फोन,मेसेजद्वारे तसे कळविले जाणार असल्याची माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

नगर शहरात करोना लसीचा तुटवडा असल्याने लस मिळेल की नाही याची चिंता सगळ्यांनाच आहे. दुसर्‍या डोसची तारीख उलटून गेल्याने लस मिळण्यासाठी ते लोक गर्दी करत आहेत. ही बाब महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मंगळवारी रात्री महापालिकेला कोविशिल्ड लसीचे 7 हजार डोस देण्यात आले. फक्त दुसर्‍या डोससाठीच ही लस वापरली जाणार आहे. ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांची यादी महापालिकेने तयार केली असून त्यांना फोन करून कळविले जाणार आहे. इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

कोव्हॅक्सिनचे डोसच नाहीत

अनेकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता त्यांना याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. मात्र कोव्हॅक्सिनचा एकही डोस महापालिकेकडे उपलब्ध नाही. शासनाकडून कोव्हॅक्सिन लस आल्यानंतर हे डोस दिले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com