
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या मुख्यालयातील अनेक वरीष्ठ अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने कामासाठी भर उन्हात येणार्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. साहेब साईट व्हिजिटला गेलेत, मीटिंगसाठी मुंबईला गेलेत, अजून आलेच नाहीत, अशी उत्तरे ऐकून नागरीक त्रस्त झाले आहेत. आयुक्तांचाही या अधिकार्यांवर वाचक राहिला नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, तीन उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, नगररचना सहाय्यक संचालक असे प्रमुख व वरीष्ठ अधिकारी नियुक्त केले आहेत. सध्या अतिरिक्त आयुक्त व सामान्य प्रशासन उपायुक्त रजेवर आहेत. त्यांचा कार्यभार इतर उपायुक्तांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, अनेकवेळा उपायुक्त व इतर अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात. ज्या अधिकार्यांना साईट व्हिजिट नाही, असे अधिकारीही सकाळी दोन तास थांबून नंतर कार्यालयातून गायब होतात. काही ठराविक अधिकारी जाणीवपूर्वक दुपारी चार-पाच नंतर कार्यालयात येतात. अधिकार्यांच्या या मनमानीचा नागरीकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या उन्हाळा असून सामान्य नागरीक भर उन्हात आपल्या कामासाठी, समस्या मांडण्यासाठी वरीष्ठ अधिकार्यांना भेटायला येतात. मात्र, कार्यालयात अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ येते. वरीष्ठ अधिकारी वेळेत उपस्थित नसल्याने विविध विभागांच्या फायलीही किरकोळ कामासाठी दिवस-दिवसभर रखडतात. मनपा अधिकार्यांना स्वत:च्याच दालनाची एलर्जी तर झाली नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.