32 कोटींत कोणाचे किती?

तापलेला भूखंड । राजकीय वर्तुळात चर्चा गरम
32 कोटींत कोणाचे किती?

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

32 कोटी खर्चून स्मशानभूमी जमीन खरेदीचा प्रस्तावाला विरोध वाढला असून राजकीय वातावरणही तापले आहे. या प्रस्तावाला विरोध करणार्‍यांची संख्या वेगाने वाढली आहे. सोबतच कोट्यवधींच्या मलिद्यात कोणाचे किती कमिशन आहे, याबाबत खमंग चर्चाही महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, विरोध वाढल्यामुळे नाईलाज झाल्याने काहींना याबाबत आधीची भुमिका बदलावी लागत असून विरोधात सामील व्हावे, लागत असल्याचे म्हटले जात आहे.

25 नोव्हेंबर रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सावेडी उपनगर परिसरात दफनभूमीसाठी 4 एकर जागा संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तब्बल 32 कोटी रुपये संबंधित जागा मालकाला द्यावे लागणार असल्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने ठेवला. महापालिकेकडे स्मशानभूमी व दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या इतर जागा असताना तसेच महानगरपालिकेच्या मालकीचे इतर भूखंड असतानाही नव्याने जागा खरेदी करणे व त्यासाठी महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नसतानाही 32 कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय, असा सवाल यामुळे उपस्थित झाला. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी या ठरावाची अंमलबजावणी न करता सदरचा ठराव शासनाकडे विखंडित करावा या मागणीने जोर धरला आहे. स्मशानभूमी व दफनभूमीसाठी मनपाकडे उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या जागेपैकी एखादी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा आशयाची मागणी अपवाद वगळता जवळपास सर्वच पक्षातून झाली आहे. काँग्रेसने याबाबत अधिक आक्रमक भुमिका घेतली आहे.

वारे, पवारांकडून विरोधाचे पत्र

स्मशानभूमी जमीन खरेदी घोटाळ्याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर हे प्रकरण पेटले. काल पत्रकार परिषद घेत त्यांनी पक्षाच्या विरोध न करणार्‍या नगरसेवकांना तातडीने दोन दिवसांच्या आत विरोधाची लेखी पत्र आयुक्तांना सादर करण्यास सांगितले होते. यानंतर काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेविका रूपाली निखिल वारे, संध्या बाळासाहेब पवार यांनी आयुक्त पंकज जावळे यांना लेखी विरोधाची पत्रे तातडीने सादर केली आहेत. आतापर्यंत शीला चव्हाण, आसिफ सुलतान, रूपाली वारे, संध्या पवार या काँग्रेसच्या सहापैकी चार नगरसेवकांनी विरोधाची पत्रे आयुक्तांना सादर केली असून उर्वरित दोन नगरसेवक लवकरच ती पत्रे सादर करतील, अशी माहिती शहर उपाध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली आहे.

32 कोटी रस्ते, पाणी, आरोग्यासाठी खर्च करा : फुलसौंदर

सावेडी परिसरात स्मशानभूमी साठी नवीन जागा खरेदी करण्यासाठीचा 32 कोटीचा ठराव मनपाच्या हिताचे नुकसानकारक आहे. सावेडी परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन स्मशान भूमीची सावेडीकरांना नितांत गरजेची आहे, परंतु मनपा विकास आराखडयातील आरक्षित जागेवरच स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली आहे. मनपा स्थापनेनंतर शहर विकास आराखडयामध्ये शहरांच्या चारही भागांसाठी ( सावेडी, केडगाव ,बुरूडगाव, माळीवाडा) शाळा, हॉस्पिटल, कचरा डेपो, स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत. सर्व विभागांसाठी जागा आरक्षित असताना नवीन सावेडी स्मशानभूमी साठी मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना जागा खरेदी करणे अयोग्य आहे. 32 कोटीचा खर्च नगर शहरामधील रस्ते, पाणी, आरोग्य यावर खर्च झाला तर तो नगरकरांसाठी सुयोग्य राहील. शहर हितासाठी ठराव विखंडीत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com