अहमदनगर महापालिकेच्या थकबाकीत वाढ, तिजोरीत खडखडाट

वसुलीसाठी महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक
अहमदनगर महापालिकेच्या थकबाकीत वाढ, तिजोरीत खडखडाट

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - महापालिकेच्या मालमत्ता कर थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वसूलीचे मनपा प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. संकलित कराची थकबाकी 215 कोटींवर जाऊन पोहचली आहे. यामध्ये गेल्या वर्षींची सुमारे 183 कोटींची थकबाकी आहे, तर चालू वर्षींची सुमारे 46 कोटींची थकबाकी आहे. यातील आतापर्यंत 14 कोटी रूपये वसूल झाले आहेत. अपेक्षित वसूली होत नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाला आहे.

करोनाचा महापालिकेच्या वसूलीवरही परिणाम झाला आहे. वसुली मोहिम थंडावली आहे. त्यामुळे महापालिकेची (Ahmednagar Municipal Corporation) आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तिजोरीट खडखडाट आहे. विकासकामांची मागणी होत आहे. परंतु, तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे नवीन कामांना मंजुरी मिळत नाही. ठेकेदार थकबाकीसाठी पालिकेकडे तगादा लावत आहेत. मात्र, तिजोरीतच पैसा नसल्याने ठेकेदारांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्‍न अधिकार्यांसमोर आहे. महापालिकेची वसुली मोहिम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असुन नुकतीच आयुक्त शंकर गोरे यांनी वसुली अधिकार्यांची बैठक घेतली.

या बैठकीत कर वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वसुली मोहिम थंडावली आहे. यामुळे थकबाकी 215 कोटींच्या घरात गेली आहे. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गेल्यावर्षी शास्तीमाफीची सवलत दिली होती. त्यामुळे वसूलीला प्रतिसाद मिळाला. मात्र, चालूवर्षी शास्तीमाफीची सवलत आयुक्तांकडून दिली गेली नाही. पूर्ण रकमेने कर वसुली करण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

परंतु, दरवर्षी जाहीर होणार्‍या शास्तीमाफीमुळे नागरिकही कर भरण्यास टाळाटाळ करतात. करोनामुळे व्यवसायिक, दुकानदार आर्थिक अडचणीत आलेले आहेत. नागरिकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत थकबाकी भरण्याचे टाळले जात आहे. यामुळे महापालिकेकडून कशा पद्धतीने वसुली मोहिम राबविली जाते, त्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावर महापालिकेची थकबाकी कमी होण्यास मदत होईल व वसुलीमुळे विकासकामांना गती मिळेल.

प्रभाग अधिकार्‍यांना चार कोटींचे टार्गेट

महापालिकेचे शहरात चार प्रभाग कार्यालय आहेत. या प्रभाग कार्यालयांतर्गत येणार्‍या प्रभागांसाठी वसुली लिपिकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कर्मचार्‍यांनी घरपट्टी व पाणीपट्टीचे बिल वाटप केले आहे. सर्वाधिक थकबाकी असल्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. त्यानुसार वसूली मोहिम राबविली जाणार आहे. आयुक्त गोरे यांनी वसुली अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रत्येक प्रभाग अधिकार्‍यांना चार कोटी कर वसूलीचे टार्गेट दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com