
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुलेंसह सर्व राष्ट्र पुरूषांच्या शहरातील पुतळ्यांच्या परिसरात नियमित स्वच्छता असावी तसेच या पुतळ्यांजवळ अतिक्रमणे करणारे तसेच वाढदिवसाचे, जाहिरातींचे फलक लावून पुतळे झाकून टाकणारे, पुतळ्यांचे विद्रुपीकरण करणारांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी शुक्रवारी (21 एप्रिल) स्थायी समितीच्या बैठकीत दिले. अशी कारवाई स्वतःहून केली नाही तसेच कुचराई केली तर चारही प्रभाग समित्यांचे प्रभाग अधिकारी व संबंधित अतिक्रमण विभाग प्रमुखांवरच प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मनपा स्थायी समितीच्या बैठकीत प्रभाग एक ते आठ या परिसरातील खड्डे दुरूस्तीसाठीची 41 लाख 64 हजार रूपये खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली. याशिवाय पाणी योजना मोटार व पंप दुरूस्ती खर्च निविदा, दवाखाने व रक्तपेढीसाठीची औषधे-रसायने-वैद्यकीय उपकरण खरेदी, हिवताप निर्मूलन व घनकचरा व्यवस्थापनासाठी जंतूनाशक द्रव्ये-कीटकनाशके-पावडर खरेदीसह विविध विभागांतील रिक्त पदांवर कंत्राटी व मानधनावर नियुक्ती, काहींच्या नियुक्तीला मुदतवाढ अशा विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या चर्चेत नगरसेवक विनित पाऊलबुध्दे, प्रदीप परदेशी, नगरसेविका रूपाली वारे, पल्लवी जाधव, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे आदींनी सहभाग घेतला.
या सभेत बोलताना सभापती कवडे यांनी शहरात राष्ट्रपुरूषांच्या 25 पेक्षा जास्त असलेल्या पुतळ्यांच्या परिसरातील दुरवस्थेवर संताप व्यक्त केला. मनपा उद्यान विभागाद्वारे या पुतळ्यांची देखभाल होत असली तरी या पुतळ्यांच्या परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत. पुतळ्यांच्या सभोवती वाढदिवसांचे व शुभेच्छांचे तसेच जाहिरातींचे फलक लावले जातात. यामुळे पुतळे झाकून जातात, असे स्पष्ट करून ते म्हणाले, महापुरूष हे समाजाचा स्वाभिमान असतो व त्यांचे पुतळे समाजाला प्रेरणादायी असतात. त्यामुळे या पुतळ्यांच्या परिसरात नियमित स्वच्छता असली पाहिजे. ती जबाबदारी उद्यान विभागाने कटाक्षाने पार पाडावी.
मात्र, पुतळ्यांभोवतीची अतिक्रमणे हटवण्यासह पुतळ्यांच्या समोर वा आजूबाजूला जाहिरातींचे तसेच वाढदिवसांचे फलक लागता कामा नये. ही जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुखांची आहे. त्यांनी याबाबत कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून नियमितपणे पुतळ्यांभोवतीचे फलक हटवावेत व ज्यांनी असे फलक लावले आहेत, त्यांच्यावर फौैजदारी कारवाई करावी, असे आदेशही सभापती कवडेंनी दिले. अशी कारवाई स्वतःहून केली नाही वा कारवाई करण्यास कसूर केला तर संबंधित प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
नागरी प्रश्नांवर चर्चा
स्थायी समितीच्या बैठकीत विस्कळित पाणीपुरवठा, बंद असलेले पथदिवे, वादळामुळे रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्यास कचरा संकलन गाड्यांनी दिलेला नकार, औषध फवारणी आदी नागरी सुविधांच्या समस्यांवरच जास्त चर्चा झडली. विविध विभागातील कमी कर्मचार्यांची समस्याही यातून पुढे आली. दरम्यान, मध्य नगर शहरात फेज-2 पाणी कनेक्शन्स बेकायदेशीरपणे दीड ते दोन हजारांत दिले जात असल्याचा दावा खुद्द सभापती कवडेंनीच केला. मनपा प्रशासनाने तरी बेकायदा नळ कनेक्शन्स कारवाईची मोहीम राबवण्याची गरजही सूचकपणे मांडली.