
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या बांधकाम विभागात (Municipal Corporation Construction Department) शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट (Fake Test Report) व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून घेत त्याच्या आधारे अधिकारी व कर्मचार्यांनी कोट्यवधी रुपयांची देयके काढल्याचा व यात मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप शिवसेनेच्या चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी केला आहे.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शेळके यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन बांधकाम विभागाकडील सर्व टेस्ट रिपोर्ट (Test Report) व थर्ड पार्टी रिपोर्टची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी होईपर्यंत सर्व संबंधित कर्मचारी व अधिकार्यांचे पगार व इतर देयके तत्काळ थांबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शेळके यांनी मनपाकडे (Municipal Corporation) 1 मार्च 2016 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील बांधकाम विभागाअंतर्गत सर्व कामांचे टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्टची मागणी केली होती. मनपाने 778 टेस्ट रिपोर्ट व 86 थर्ड पार्टी रिपोर्ट बांधकाम विभागाकडे (Construction Department) उपलब्ध असल्याची माहिती दिली. हे सर्व रिपोर्ट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्याद्वारे प्रमाणित असलेले आहेत. तसेच, याच कालावधीतील टेस्ट रिपोर्टची माहिती शेळके यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे मागितली असता त्यांनी 329 टेस्ट रिपोर्ट दिले व एकही थर्ड पार्टी रिपोर्ट दिला नाही, असे स्पष्ट केले. यावरून नगर महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation)असलेले सर्व थर्ड पार्टी रिपोर्ट हे बनावट असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही संस्थांकडील उपलब्ध माहितीनुसार सुमारे 449 टेस्ट रिपोर्ट खोटे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असा दावा शेळके यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात खोटे टेस्ट रिपोर्ट बांधकाम विभागात दाखल होऊन त्या आधारे बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांची देयके अदा केली गेली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारची चौकशी करावी. जोपर्यंत सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत संबंधित कालावधीतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांचा पगार तथा इतर देयके थांबवण्यात यावीत. सदर कालावधीतील कामांची ज्या ठेकेदार संस्थांना बिले दिलेली आहेत, त्यांची आताची सर्व देयके तातडीने थांबवावीत. सदर कालावधीतील बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई न केल्यास आयुक्तांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही शेळके यांनी दिला आहे.
अतिरिक्त आयुक्तांमार्फत होणार चौकशी
शेळके यांनी केलेल्या तक्रारीमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. खोटी प्रमाणपत्रे दाखल करून घेणे, हा गुन्हा असल्याने अधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यामार्फत याची चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.