
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहरात महापालिका स्थापन होऊन 19 वर्षे झाली आहेत. त्यावेळी नगरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता बड्या शहराप्रमाणे शहर आणि उपनगरातील नागकरांना सुविधा मिळतील. परंतु 19 वर्षांनंतर अतिरिक्त सुविधा सोडा नगरकर मुलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत.
नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. शहरात सर्वसामान्य नागरिकांना परवडेल या किंमतीमध्ये घर मिळत नसल्याने शहराच्या लगत वस्त्या, उपनगरांची गर्दी वाढत आहे. यामुळे जागांच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. नागरिक उपनगरांकडे वळाले असून केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, भिंगार या उपनगरांचे विस्तारिकरण होत आहे. मात्र, उपनगरांच्या विस्तारीकरणात नागरिकांना मिळणार्या सुविधा तोकड्या ठरत आहेत. रस्ते, पाणी, गटार, कचरा या मुलभूत सुविधा नागरिकांच्या आहेत. या उपनगरांत नागरिकांनी घरे घेऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतच्या सुुविधा वेळेवर मिळतात. परंतु महापालिकाच्या सुविधांसाठी कित्येक वर्षांची वाट पाहावी लागते. शहरासह उपनगरांत रस्त्यांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. तसेच गटार व पिण्यासाठी पाणी अजून बर्याच ठिकाणी नागरिकांना मिळत आहे. उपनगरात सर्वसामान्य नागरिक राहतात. महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर टॅक्सही सगळ्यात आगोदर सर्वसामान्य नागरिक भरतो. मग त्यांना सुविधा का नाही? असा प्रश्न आता पडला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी महापालिकेत मोर्चा काढलाच तर अधिकारी त्यांचा मोर्चा डावलून लावतात.
राजकीय नेते, नगरसेवक व अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना कधी सुविधा पुरविणार. कधी नगर शहर हे शेजारील शहरासारखे चकाकणार हे नगरकरांना फक्त स्वप्नच पाहावे लागणार का?. शहरात उड्डाणपूल झाला खरा पण नगरमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे कधी बुजणार. फक्त एका उड्डाणपुलाने शहराची प्रगती होते का? उड्डाणपुलाचीही किती काळजी महापालिका घेणार, तसेच उड्डाणपुलाइतकीच नागरिकांना पाणी, रस्त्यांची गरज आहे.सर्वसामान्य नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक, महापौर हे नागरिकांच्या हाकेला धावणार का? महापालिकेकडून कामे करून घेणार का? असा प्रश्न आता पडला आहे.