ठेकेदारांची बिले महापालिकेने थकवली

आयुक्तांच्या आदेशानंतरही टाळाटाळ : आर्थिक परिस्थिती बिकट
ठेकेदारांची बिले महापालिकेने थकवली

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेने ठेकेदारांची देयके थकवली असून, त्यामुळे ठेकेदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या आदेशानंतरही ही बिले मिळत नसल्याने ठेकेदार संतप्त झाले आहेत.

बर्‍याच वर्षापासून प्रलंबित असलेली महानगरपालिकेतील ठेकेदारांची 50 हजार रूपये आतील रक्कमेची देयके देण्याची मागणी ठेकेदार संघटनेच्यावतीने करण्यात होती. या बाबीकडे कोणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने 25 जानेवारीला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय गेट जवळ ठेकेदार संघटनेच्यावतीने उपोषण करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिकेचे प्रभारी आयुक्त पद असल्याने त्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण सोडवावे, असे सांगितले गेले. त्यानुसार आम्ही 28 जानेवारीला मुख्य लेखा अधिकारी यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानंतर ठेकेदार महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनीही आश्‍वासन दिले की मार्चअखेरच्या आत देयके अदा होतील. तसे आदेशही संबंधित विभागाला गेल्याचे समजले. परंतु, अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

मागील दोन वर्षांपासून हातात कोणतीही कामे नाही. छोट्या ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, काही ठेकेदारांच्या कुटुंबियांवर करोनाचे सावट देखील आलेले आहे. शेतकर्‍यांप्रमाणे आत्महत्या हा एकमेव पर्याय उरेल. ठेकेदारांचे असे मत आहे की, मरायचेच आहे तर घरात मरण्यापेक्षा महानगरपालिकेसमोर मरू, इतक्या टोकापर्यंत विचार करण्याची वेळ आलेली आहे. ठेकेदारांची देयके लवकरात लवकर अदा करण्याची मागणी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी ठेकेदार संघटनेचे अमृत नागून, शहानवाज शेख, अमृत वन्नम, मोसिन शेख, संजय डुकरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com