मनपाच्या 1 हजार 200 कर्मचार्‍यांचे उद्यापासून मुंबईकडे लाँगमार्च

बैठक तोडग्या विना || 770 कर्मचार्‍यांचे सामुहिक रजेचे अर्ज
मनपाच्या 1 हजार 200 कर्मचार्‍यांचे उद्यापासून मुंबईकडे लाँगमार्च

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा व सफाई कर्मचार्‍यांमधील मागासवर्गीयांनाही वारसा हक्क नोकरीचे लाभ मिळावेत, या प्रमुख मागण्यासाठी सोमवार (दि.2) ला नगर ते मंत्रालय असा लाँगमार्च काढण्यावर महापालिका कामगार संघटना ठाम आहेत. दरम्यान, यासंदर्भात शनिवारी आ. संग्राम जगताप, मनपा आयुक्त पंकज जावळे व संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघू शकला नाही. यामुळे नगर मनपाचे 1 हजार 238 कर्मचारी मुंबईकडे लाँगमार्च काढत रवाना होणार आहेत.

मनपा कर्मचारी संघटनेच्या लाँगमार्च आंदोलनामुळे नगर महापालिकेसह जिल्ह्यातील पाच ते सहा नगरपालिकांचे कामकाजही विस्कळीत होणार असून या ठिकाणचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगर मनपामधील 770 कर्मचार्‍यांचे सामूहिक रजेचे अर्ज संघटनेने आयुक्तांकडे सादर केले आहेत. नगर मनपा कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत सोमवारपासून नगर ते मंत्रालय असा लाँगमार्च आयोजित करण्यात आला आहे. पाणी पुरवठा, वैद्यकीय सेवा व अग्निशमन यंत्रणा कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी व सफाई कामगार आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी त्यांनी सामूहिक रजेचे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे सोमवारपासून नगर मनपाचा कारभार ठप्प पडण्याची शक्यता आहे.

संघटनेच्या मागण्यांसंदर्भात शनिवारी आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त जावळे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, संघटनेचे पदाधिकारी अनंत लोखंडे, आनंद वायकर, बाबासाहेब मुदगल, गुलाब गाडे, विठ्ठल उमाप, नंदकुमार नेमाने, बलराज गायकवाड आदी पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी जावळे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले तर आ. जगताप यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच वारसा हक्काचे लाभ मिळण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा करून सुधारित परिपत्रक जारी करण्याचेही आश्वासन दिले. मात्र संघटनेचे पदाधिकारी लाँगमार्च काढण्यावर ठाम आहे. मंत्र्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढा, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असे संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.

श्रीरामपूर, राहुरी, देवळालीतील कर्मचारी सहभागी होणार

नगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू झाला असला तरी लाड-बर्वे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा आणि पारनेर या पालिकातील कर्मचारीही सामूहिक रजा टाकून नगरच्या लाँगमार्चमध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे याठिकाणच्या कामावर परिणाम होणार आहे. लाँगमार्चसाठी जिल्हा भरातील आंदोलनकर्ते रविवारी नगरमध्ये मुक्कामाला पोहचणार आहेत. याशिवाय राज्यातील अमरावती, औरंगाबाद, धुळे, सोलापूर या महापालिकांची पदाधिकारीही आंदोलनासाठी आज नगरमध्ये दाखल होत आहेत. लाँगमार्च दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महापालिकांचे पदाधिकारीही सहभागी होणार असल्याचे नगर मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com