अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर महापालिकेला नवे आयुक्त नियुक्त करण्यात आले. तसेच स्थायी समितीचा कोरम पूर्ण झाला. त्यामुळे सभापती पदाची माळ

कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असली तरी सभापती पदाच्या निवडणुकीचा प्रोग्राम अजून आलाच नाही. आयुक्तांची नियुक्ती झाली तरी अजूनही ते नगरला हजर झालेले नाहीत. दोघांची उत्सुकता असलेल्या नगरकरांना त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असे चित्र दिसते आहे.

श्रीकांत म्याकलवार रिटायर झाल्यानंतर कलेक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे आयुक्त पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला. गत आठवड्यात नगरला शंकर गोरे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. मात्र घरगुती समारंभामुळे ते नगरला हजर होऊ शकले नाहीत. ते कधी येणार याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

स्थायी समितीच्या 16 सदस्यांचा कोरमही याच महिन्यात पूर्ण झाला. कोरम पूर्णत्वानंतर सभापती पदाची निवडणूक होते. मात्र त्याचा प्रोग्राम हा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून जाहीर केला जातो. महापालिका प्रशासनाने प्रस्ताव नाशिकला धाडला असला तरी अजून नाशिकहून नव्या सभापती पदाच्या निवडणुकीचा प्रोग्रामच जाहीर झालेला नाही. तो कधी लागतो, अन् कोण सभापती होतो? याकडे नगरकरांच्या नजरा लागून आहेत.

नुसतीच चर्चा

स्थायी समितीचा सभापती कोण? याची उत्कंठता जशी ताणली गेली तसाच प्रकार आयुक्तासंदर्भातही आहे. नवे आयुक्त गोरे यांची कार्यपध्दती कशी असेल, ते कठोर निर्णय घेणार की यापूर्वीच्या आयुक्तांसारखे मवाळपणाचे धोरण राबविणार याची चर्चा महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात विविधांगाने सुरू आहे. सभापती पद आणि आयुक्त या दोन्हींचीही नुसतीच चर्चा सुरू आहे.