शहरातील मोकाट जनावरांची धरपकड

महापालिकेने खासगी संस्थेकडे सोपवली जबाबदारी
शहरातील मोकाट जनावरांची धरपकड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेकडे सोपवले असून या संस्थेने मंगळवारी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आडकाठी आणणार्‍या लोकांवर गुन्हा नोंदवून थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

दरम्यान पकडण्यात आलेली सर्व जनावरे पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या कोंडवाड्यात नेऊन सोडण्यात येणार आहेत. शहरात 400 ते 700 मोकाट जनावरांची भटकंती सुरू आहे. ही जनावरे चौकाचौकांत रस्त्यावर फिरत असताना दिसतात. या जनावारांमुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच त्याचबरोबर वाहतूक कोंडी आणि अपघात या घटनाही घडत आहेत. रस्त्यावर उभी राहणारी ही मोकाट जनावरे नागरिकांचा पाठलाही करतात त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये या जनावरांची भीती निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात मोकाट जनावरे पकडण्याचे काम निविदा पद्धतीने एका खासगी संस्थेकडे सोपवले आहे. या संस्थेच्या कामगार पथकाने मंगळवारपासून मोकाट जनावरे पकडण्यास सुरूवात केली आहे. या पथकाबरोबर उपायुक्त यशवंत डांगे हेही रस्त्यावर उतरले होते. पुढील दोन महिन्यांत शहरातील रस्त्यावर एकही मोकाट जनावर दिसणार नाही, या पद्धतीने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. पकडलेली जनावरे मालकांच्या मागणीनंतर जागेवर सोडून मिळणार नाही. त्यासाठी मालकाने पिंपळगाव माळवी येथील मनपाचे कोंडवाड्यावर जाऊन रितसर दंड भरून सोडून आणावी लागणार आहेत. या कारवाईनंतर जनावरे मोकाट सोडल्यास संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com