चारही प्रभाग कार्यालयात जन्म-मृत्यूचे दाखले

सोमवारपासून वितरणाचे नियोजन
चारही प्रभाग कार्यालयात जन्म-मृत्यूचे दाखले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील नागरिकांना जन्म व मृत्यूची नोंदणी व दाखले चारही प्रभाग कार्यालयांमार्फत वितरित करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून चारही प्रभाग कार्यालयांमार्फत जन्म मृत्यू नोंदणी व दाखले वितरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन महापालिका स्तरावर सुरू असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या महानगरपालिका कार्यालयातील जन्म व मृत्यू नोंदणी विभागामार्फत जन्माची व मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दाखल्यांचे वितरणही याच कार्यालयातून केले जाते.

दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्याने नवीन उपनगरांमध्ये वसाहती वाढत आहेत. जन्म व मृत्यूची नोंदणी व दाखल्यांचे काम एकाच ठिकाणाहून सुरू असल्याने उपनगर परिसरातील नागरिकांना दाखल्यांसाठी जुन्या पालिकेत यावे लागते. नागरिकांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी मनपा आयुक्त जावळे यांनी आता चारही प्रभाग कार्यालयांमार्फत जन्म व मृत्यूची नोंदणी तसेच दाखल्यांचे वितरण सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com